धक्कादायक! लंडनला शिक्षणासाठी गेलेली छत्रपती संभाजीनगरची मुग्धा देशमुख पुण्यात मृतावस्थेत आढळली; पोलिसांकडून तपास सुरू
पुणे / छत्रपती संभाजीनगर : लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलेली आणि अचानक बेपत्ता झालेली छत्रपती संभाजीनगरमधील ३४ वर्षीय मुग्धा देशमुख पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरसह पुणे परिसरात खळबळ उडाली आहे. ऑनलाइन व्यवहारांच्या तांत्रिक तपासातून पोलिसांना मुग्धाचा शोध घेण्यात यश आले.
मुग्धा देशमुख ही छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा येथील दशमेशनगर परिसरात राहणाऱ्या आणि महापालिकेचे निवृत्त अभियंता असलेल्या अविनाश देशमुख यांची मुलगी होती. जुलै २०२५ मध्ये ती एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेली होती. मात्र, काही दिवसांपासून तिच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते. अखेर तिचे वडील अविनाश देशमुख यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
२३ ऑक्टोबरला आईशी झाले होते शेवटचे बोलणे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी मुग्धाचे आईशी फोनवर शेवटचे संभाषण झाले होते. त्यावेळी नोकरीच्या मुलाखतीसाठी घाईत असल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिचा फोन बंद येत होता.
मुग्धाच्या मैत्रिणीशी संपर्क साधला असता, २२ ऑक्टोबर रोजी मेसेजद्वारे तिचा मुग्धाशी संवाद झाल्याचे समोर आले. त्यानंतर संपर्क न झाल्याने मैत्रिणीला लंडन पोलिसांकडे तक्रार करण्याची विनंती करण्यात आली. लंडन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुग्धाने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लंडन सोडले होते. यानंतर कुटुंबीयांनी भारतीय उच्चायुक्तांकडेही तक्रार केली.
बँक खात्यातील ऑनलाइन व्यवहारांमुळे मिळाला धागा
मुग्धाने लंडन सोडून भारतात परतल्याचा संशय कुटुंबीयांना आला. तिच्या बँक खात्यातील व्यवहारांची माहिती तपासली असता झोमॅटो, ब्लिंकिट, स्विगी, बुक माय शो, मेकमायट्रिप आणि व्हीएफएस यांसारख्या सेवांशी संबंधित व्यवहार झाल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे, ब्लिंकिटवरून उस्मानपुरा परिसरातही ऑर्डर मागवण्यात आल्याचे लक्षात आल्याने कुटुंबीयांचा संशय वाढला. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी त्यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
झोमॅटोच्या ऑर्डरमधून पोलिसांना मिळाला पत्ता
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक किरण बोराडे यांच्याकडे सोपवली. पोलिसांनी मुग्धाच्या ऑनलाइन पेमेंट आणि तांत्रिक माहितीचा तपास सुरू केला.
यावेळी झोमॅटोच्या ऑर्डर हिस्ट्रीतून पुण्यातील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीचा पत्ता पोलिसांच्या हाती लागला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक किरण बोराडे, पोलीस कर्मचारी विलास कराळे आणि अन्य कर्मचारी पिंपरी-चिंचवडमधील शिरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या सोसायटीत पोहोचले.
बंद फ्लॅटमध्ये आढळला मुग्धाचा मृतदेह
पोलिसांनी मुग्धाच्या फ्लॅटचे दार ठोठावले; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने दुसऱ्या चावीच्या सहाय्याने दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी मुग्धा फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली.
प्राथमिक तपासात मुग्धाने याच सोसायटीमध्ये एप्रिल महिन्याच्या सुमारास अपार्टमेंट भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे. ती ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून येथे राहत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुण्यात वास्तव्यास असताना ती एमबीएच्या विद्यार्थ्यांना काही विषय ऑनलाइन शिकवत असल्याचेही समजते.
या प्रकरणी शिरेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदनानंतर मुग्धाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मुग्धा पुण्यात कधी आणि का आली? पोलिसांकडून तपास सुरू
मुग्धाने लंडन सोडल्यानंतर पुण्यात येण्याचा निर्णय कधी आणि कसा घेतला? तिने कुटुंबीयांना याबाबत माहिती का दिली नाही? ती पुण्यात नेमकी कोणाच्या संपर्कात होती? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक किरण बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन पेमेंटच्या नोंदी आणि झोमॅटोच्या डिलिव्हरी हिस्ट्रीचा तपास केल्यानंतर पोलिसांना गहुंजे येथील पत्ता मिळाला. या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी सुरू असून, मुग्धाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
