धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार मंजूर केला आहे. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या विद्यमान खात्यांसह शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
हा निर्णय देशभरात गाजलेल्या NEET पेपर लीक प्रकरण, विद्यार्थ्यांच्या आंदोलनां आणि संसदेतील विरोधकांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन तीव्र झाले होते.
CJP च्या आंदोलनानंतर वाढला दबाव
दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनामुळे या प्रकरणाने राष्ट्रीय स्तरावर मोठे राजकीय स्वरूप धारण केले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे नेते आंदोलनात सहभागी झाले.
२० जुलै रोजी संसद मार्चदरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा मुद्दा आणखी तापला. संसदेतही विरोधकांनी सरकारला घेरले आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली.
JP नड्डा यांच्याशी झाली होती बैठक
राजीनाम्याच्या काही तासांपूर्वी CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रंका यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या बैठकीत धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्यासह आंदोलनातील प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात सादर करण्यात आल्या. बैठकीनंतर सौरव दास यांनी मंत्री स्तरावर या मागण्यांवर चर्चा होईल, असे आश्वासन मिळाल्याची माहिती दिली होती. मात्र कोणतीही ठोस हमी मिळालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
CJP कडून पुढील दोन मागण्या कायम
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आंदोलन संपलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी दोन प्रमुख मागण्या पुन्हा मांडल्या आहेत.
- पेपर लीक प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ₹१ कोटींची भरपाई द्यावी.
- २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला, तरी उर्वरित मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.
राजीनाम्यापूर्वी भावनिक पत्र
राजीनामा देण्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर खुलं पत्र प्रसिद्ध करत गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे मन व्यथित झाल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांचे भविष्य हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत, देशातील युवकांच्या हितासाठी आपण पुढेही कार्यरत राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रल्हाद जोशींकडे अतिरिक्त जबाबदारी
राष्ट्रपतींच्या आदेशानुसार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसह शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. कायमस्वरूपी शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत ते मंत्रालयाचे कामकाज पाहणार आहेत.
शिक्षण मंत्रालयाच्या नव्या नेतृत्वाखाली परीक्षा प्रणालीतील सुधारणा, पेपर लीक प्रकरणांवरील कारवाई आणि विद्यार्थ्यांशी संबंधित निर्णयांकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.
