धर्मेंद्र प्रधानांचा केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा; विद्यार्थ्यांना उद्देशून भावनिक पत्र
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि देशातील युवकांना उद्देशून एक खुलं पत्र प्रसिद्ध करत गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर भाष्य केले.
धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रात म्हटले की, गेल्या दहा दिवसांतील घटनांमुळे आपण व्यथित झालो असून हा विषय वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसून देशातील युवकांच्या भविष्याशी संबंधित आहे.
NEET प्रकरणावर घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख
पत्रात त्यांनी नमूद केले की, NEET-UG 2026 परीक्षेत अनियमितता समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने चौकशी सीबीआयकडे सोपवली, परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि पुढील वर्षापासून परीक्षा संगणकाधारित (Computer-Based Test) पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेतला.
त्यांनी म्हटले की, २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन तसेच पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.
‘विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्याही परीक्षा माफियामुळे उद्ध्वस्त होऊ देणार नाही’
धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रात लिहिले आहे,
“पहिल्याच दिवशी मी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आणि कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे भविष्य परीक्षा माफियामुळे उद्ध्वस्त होऊ देणार नाही, हा माझा निर्धार होता.”
तसेच, १६ जुलै रोजी जाहीर झालेल्या NEET-UG निकालात अनेक गरीब आणि ग्रामीण पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांनी यश मिळवले, असेही त्यांनी नमूद केले.
लोकशाहीवरील विश्वास कायम असल्याचे विधान
पत्रात त्यांनी पुढे म्हटले की, देशातील युवकांची स्वप्ने, आकांक्षा आणि अपेक्षांचा आपण नेहमी आदर केला आहे. जंतर-मंतरवरील आंदोलन आणि देशातील निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा राष्ट्रविरोधी शक्तींनी घेऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
तसेच विद्यार्थ्यांनी आंदोलनाऐवजी शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन करत आपण आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.
पंतप्रधान आणि सहकाऱ्यांचे मानले आभार
राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी, मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि देशवासीयांचे आभार मानले. भविष्यातही राष्ट्रसेवा आणि युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


