Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुण्यात सिनेस्टाईल अपहरण! ५० लाखांच्या वादातून कंत्राटदाराला कंटेनरमध्ये डांबून मारहाण

Spread the love

पुण्यात भरदिवसा घडलेल्या थरारक अपहरणाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मेट्रो प्रकल्पात काम करणाऱ्या एका कंत्राटदाराला खडी क्रशर प्लॅन्ट दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून, त्याचे अपहरण करण्यात आले. ५० लाखांच्या जुन्या आर्थिक वादातून पाच जणांनी या व्यावसायिकाला कंटेनरमध्ये डांबून मारहाण करत त्याच्या कुटुंबाकडे खंडणीची मागणी केली.

मात्र, खराडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अहिल्यानगर रस्त्यावर सिनेस्टाईल पाठलाग करून नाकाबंदी केली आणि अपहरण झालेल्या व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली. यावेळी पाचही आरोपींना अटक करण्यात आली.

५० लाखांच्या वादातून कट रचला

या प्रकरणातील फिर्यादी ४० वर्षीय व्यावसायिक असून, ते मेट्रो प्रकल्पात सिव्हिल वर्क करतात. मुख्य आरोपी सागर झुरुंगे याच्याशी त्यांची ओळख होती. झुरुंगे हा खडी-क्रशर माल पुरवठा करत होता आणि त्याच्याकडे सुमारे ५० लाख रुपये देणे बाकी होते. याच वादातून अपहरणाचा कट रचण्यात आला.

इराणी कॅफेत भेट, पुढे सापळा

१३ एप्रिलला आरोपीने फोन करून “कामाबद्दल बोलायचं आहे” असे सांगितले. १४ एप्रिल रोजी खराडीतील एका कॅफेत दोघे भेटले. काही वेळ गप्पा झाल्यानंतर “क्रशर प्लॅन्ट दाखवतो” असे सांगून आरोपींनी व्यावसायिकाला गाडीत बसवले.

मात्र, त्यानंतर त्यांना थेट खराडी जकात नाका परिसरात नेऊन एका कंटेनरमध्ये डांबण्यात आले. तिथे आधीच काही आरोपी उपस्थित होते.  कंटेनरमध्ये आरोपींनी व्यावसायिकाला बेदम मारहाण करत “आजच ५० लाख दे, नाहीतर सोडणार नाही,” अशी धमकी दिली. त्यांचा मोबाईल बंद करून त्यांना कैदेत ठेवण्यात आले.

यानंतर आरोपींनी व्यावसायिकाच्या वडिलांना फोन करून स्पष्ट धमकी दिली. “तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, पैसे दिल्याशिवाय सोडणार नाही,” असा इशारा दिला. यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.

सिनेस्टाईल पाठलाग, पोलिसांची धाडसी कारवाई

खराडी पोलिसांनी त्वरित हालचाल करत संशयित वाहनाचा मार्ग (Tracking) काढला. आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी गाडी बदलण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अहिल्यानगर रोडवरील विजय स्तंभाजवळ नाकाबंदी करून गाडी अडवली. गाडीतून अपहरण झालेला व्यावसायिक सुरक्षित आढळून आला आणि पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले.

५ आरोपी जेरबंद, तपास सुरू

या प्रकरणात सागर दत्तात्रय झुरुंगे (३९), विजय सुरेश वाळुंज (३८), राजू विजयकुमार सहाणे (३२), रुपेश शिवाजी गावडे (३८, सर्व रा. लोणीकंद) आणि प्रकाश बाळासाहेब राऊत (३४, रा. तुळापूर) यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींवर अपहरण, मारहाण आणि खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

जळगाव शालार्थ घोटाळा उघड: ६०० बनावट शिक्षक आयडी, कोट्यवधींचा पगार लाटला; ४८ अधिकाऱ्यांना SIT नोटीस

 

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!