NewDelhiNewsUpdate : निवडणूक आयोगाविरुद्ध इंडिया आघाडीचा नेमका आक्षेप काय ? आज दिल्लीत काय झाले ?
नवी दिल्ली: सध्या दिल्लीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वीच इंडिया आघाडीने दिल्लीच्या रस्त्यांवर उतरून जोरदार आंदोलन केले. मतांची चोरी झाल्याचा आरोप करत, आघाडीच्या ३०० हून अधिक खासदारांनी संसद भवनासमोर निदर्शने केली.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत, विरोधी पक्षांनी आयोगाच्या निष्पक्षतेवर आक्षेप घेतला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.
नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
आंदोलनादरम्यान, प्रियंका गांधी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेत्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. प्रियंका गांधी यांनी “केंद्र सरकार घाबरले आहे,” अशी थेट टीका केली. देशातील जनतेचा विश्वास गमावलेल्या सरकारला आता लोकशाहीच्या सर्व संस्थांचा दुरुपयोग करावा लागत आहे, असे त्या म्हणाल्या.
राहुल गांधी काय म्हणाले ?
राहुल गांधींनी या लढ्याला राजकीय नसून संविधानाच्या संरक्षणाची लढाई असल्याचे म्हटले. “आम्ही ‘एक व्यक्ती, एक मतदान’ या तत्त्वासाठी लढत आहोत. आम्हाला एक स्पष्ट आणि सुरक्षित मतदार यादी हवी आहे,” अशी मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगावर विश्वासार्हता गमावल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचे स्पष्ट केले.
आंदोलनातील सहभाग आणि पोलिसांची कारवाई
या ऐतिहासिक आंदोलनात ‘इंडिया’ आघाडीतील विविध पक्षांचे सुमारे ३०० खासदार सहभागी झाले होते. अनेक खासदारांनी बॅरिकेड्सवर चढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांची एकजूट आणि त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी धरपकड सुरू केली. या कारवाईमुळे विरोधी नेत्यांनी पोलिसांच्या कृतीवरही नाराजी व्यक्त केली.
राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर १० गंभीर आरोप
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर १० गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
1. गेल्या ५ वर्षांत जेवढे मतदार वाढले नाहीत, तेवढे गेल्या ५ महिन्यांत कसे वाढले?
2. प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदारसंख्या कशी असू शकते?
3. निवडणुकांचे वेळापत्रक ठरवून नियंत्रित केले जात आहे.
4. निवडणूक आयोग डिजिटल मतदान यादी का देत नाही?
5. सीसीटीव्ही फुटेजच्या नियमांमध्ये अचानक बदल का केला गेला?
6. कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १ लाख मतांची चोरी झाल्याचा आरोप.
7. मतचोरीसाठी खोट्या पत्त्यांचा वापर केला जात आहे.
8. निवडणूक आयोग पुरावे देत नाही, उलट पुरावे नष्ट करत असल्याचा दावा.
9. फॉर्म ६ चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे.
10. महाराष्ट्रात ५ महिन्यांत ४१ लाख मतदार कसे वाढले?
