सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलतर्फे सत्कार, वडिलांच्या आठवणीने गहिवरले गवई !!

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या ५२ व्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची निवड झाल्याने महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उद्देशून केलेल्या भाषणात सरन्यायाधीश गवई कमालीचे भावुक झाले. बार काऊन्सिलच्या सदस्यांचे आणि राज्यभरातील वकिलांचे प्रेम पाहून मी ओथंबून गेल्याची भावना सरन्यायाधीश गवई यांनी बोलून दाखवली. तसेच माझे वडील आज हे पाहायला हवे होते. आई सोबत आहे हे माझे भाग्य आहे, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.
भारताचा सरन्यायाधीश म्हणून 14 तारखेला मी शपथ घेतली. त्यानंतर जनतेच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. कित्येक वकिलांचे फोन आले. कित्येक जण भेटायला आले. गेली ४० वर्षे तुमचे आशीर्वादरुपी प्रेम माझ्यावर आहे. आज सत्काराला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, मी साहित्यिक नाही, तुमच्या प्रेमाला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत, असे सुरुवातीलाच सरन्यायाधीश गवई म्हणाले. भाषणात गवई यांनी वकिलीच्या सुरुवातीपासून सरन्यायाधीश होण्यापर्यंतचा प्रवास कथन केला.
माझ्या प्रवासाची प्रवासाची सुरुवात अमरावतीतून झाली. मी आज जो काही आहे, त्यामागे आई आणि वडिलांचे संस्कार माझ्यावर माझ्यावर आहेत. आईकडून आम्ही कष्ट शिकलो. वडिलांनी बाबासाहेबांच्या चळवळीच्या कामात स्वतःला झोकून दिले. त्यामुळे घराची जबाबदारी आईवर आली. आईने आमच्यावर खूप चांगले संस्कार केले. सर्वांसोबत जगायची प्रेरणा लहानपणापासून मिळाली. माझ्या जडणघडणीत वडिलांचे मोठे योगदान आहे.
बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लहानपणापासून जपलेत. वडील वकील बनू शकले नाहीत, त्यामुळे मी वकील व्हावे अशी त्यांची इच्छा होती. वडील विधानपरिषदेचे उपाध्यक्ष झाले, आम्ही मुंबईला आलो. परिस्थिती चांगली झाली. 1985 मध्ये वकिलीला मी सुरुवात केली. वडील म्हणाले तू जर न्यायाधीश झालास तर बाबासाहेबांचे विचार पुढे नेऊ शकशील. भूषण एक दिवस सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होईल, असे ते म्हणाले होते. आज हा दिवस पाहायला ते असायला पाहिजे होते. 22 वर्षे झाले वेगवेगळ्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. 22 वर्षात अनेक महत्वाचे निर्णय देण्याची संधी मिळाली, असे सरन्यायाधीश गवई यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयात बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याची संधी मिळाली
राजाभाऊनी आम्हाला मॅटर सोल्व्ड करायची मोकळीक दिली. त्यांची उणीव भासतेय. मी सुप्रीम कोर्टाच्या बिल्डिंग कमिटीमध्ये सभासद असताना मला बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवंत समजतो. मुंबईत भरपूर मित्र मिळाले. 1990 ला नागपूरला गेल्यावरही खूप मित्र मिळाले.
नागपूरच्या लाखो झोपडपट्टीवासियांचे छप्पर हरवणार होते, ते मी वाचवू शकलो मला आनंद आहे. मला आनंद आहे २००८ साली बार काऊन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याशी संबंध आला. बारचा कोणताही कार्यक्रम असला तरी मी सहभागी व्हायचो. आनंद म्हणजेच 26 जानेवारी 2025 रोजी राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण केली. आपली जी संविधानिक राज्यघटनेची वाटचाल आहे ती 75 वर्षाची झाली. कार्यपालिकेने आणि विधीपालिकेने अनेक कार्य केले. न्यायपालिकेने अनेक कायद्यांना न्याय दिला. आम्हाला जी संधी दिली ती आम्ही वापरली. आपण सर्वसमावेशक असलं पाहिजे, असे सरन्यायाधीश म्हणाले.
बार काऊन्सिलच्या नावाला कधीही काळा डाग लागेल असे काम करणार नाही….
मणिपूरमध्ये 2 जमातीमध्ये वाद चालू आहे, त्यांना आश्वासित करून आलो. ही संधी मिळाली यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. बार काऊन्सिलच्या नावाला कधीही काळा डाग लागेल, असे काम माझ्या हातून होणार नाही, असे वचन सरन्यायाधीशांनी दिले. तसेच निवृत्त झाल्यानंतर कोणतीही असाइनमेंट घेणार नाही. अमरावती, नागपूर, गोवा मुंबईचा सदस्य होतो. दुसरा कोणताही सत्कार मी स्वीकारणार नाही. जे कबूल केलंय त्याच्यानंतर कोणतीही गोष्ट करणार नाही. माझ्या प्रवासात कुटुंबाचा मोठा त्याग आहे. माझ्या वाटचालीत माझ्या पत्नीचा वाटा आहे, असेही भूषण गवई यांनी नमूद केले.