India-Pakistan tension Live : मध्यरात्रीच्या दोन मोठ्या बातम्या : पाकिस्तानचे कराची बंदर उद्ध्वस्त, भारतीय सैन्याने पाकिस्तानी विमाने पाडली, पाकच्या AWACS चाही समावेश !!

नवी दिल्ली : आज मध्यरात्रीच्या दोन महत्वाच्या बातम्या म्हणजे भारतीय नौदलाने पाकिस्तानचे कराची बंदर उद्ध्वस्त केले आहे. नौदलाने केलेल्या हल्ल्यात नौदलाने कराची बंदरावर अनेक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यांमध्ये कराची बंदर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे बोलले जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलाने आधीच अरबी समुद्रात आयएनएस विक्रांत तैनात केले आहे. तर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे इस्लामाबादने जम्मू आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्यानंतर भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने एक पाकिस्तानी एफ-१६ , दोन जेएफ-१७ आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) देखील उद्ध्वस्त केली आहे.
हे नौदलाचे स्ट्राइक जहाज कारवार किनाऱ्याजवळ तैनात करण्यात आले होते. त्यांच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये विमानवाहू जहाजे, विध्वंसक, फ्रिगेट्स, पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि इतर सहाय्यक जहाजे समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ, भारताच्या तिन्ही सैन्याने एकत्रितपणे प्रथम पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर असे दिसते की पाकिस्तानने युद्धाचा निर्णय घेतला आहे, ज्याला सैन्य योग्य उत्तर देत आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. आज रात्रीपासून पाकिस्तानने पुन्हा हल्ला सुरू केला. या हल्ल्याला भारतानेही प्रत्युत्तर दिले. दरम्यान, आता भारतीय हवाई दलानंतर आता नौदलही सक्रिय झाले आहे. अरबी समुद्रात तैनात असलेल्या आयएनएस विक्रांतने कराचीला लक्ष्य केले आहे. नौदलाच्या हल्ल्यामुळे कराची बंदरासह शहरात मोठी आग लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या कराची आणि ओरमारा बंदरांवर आयएनएस विक्रांतवरून अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. त्यामुळे दोन्ही बंदरांवर मोठी आग लागली. या हल्ल्यामुळे दोन्ही बंदर शहरांमध्ये धुराचे लोट पसरले आहेत. लोक घाबरून किनारी भाग सोडून आत पळत असल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानी नौदलाचे कराची आणि ओरमारा येथे तळ आहेत. तिथे त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांचे मुख्यालय, युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात आहेत. या ठिकाणीच हल्ले करुन आयएनएस विक्रांतने पाकिस्तानी नौदलाला मोठ्या प्रमाणात हादरवून टाकण्यात यश मिळवले आहे. सध्या भारतीय नौदलाचे ऑपरेशन सुरू आहे.
अरबी समुद्रात आयएनएस विक्रांतच्या तैनातीची पाकिस्तानला आधीच भीती होती. या विमानवाहू जहाजामध्ये ३० मिग २९के लढाऊ विमान आहेत . हे भारताचे पाण्यात तरंगणारे हवाई तळ आहे. या विमानवाहू जहाजासोबत अनेक विध्वंसक, फ्रिगेट्स, इंधन भरणारी जहाजे आणि पाणबुड्यांचा ताफा आहे. यामुळे या युद्धनौकेला टक्कर देणे अशक्य आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तानी विमाने पाडली
सरकारी सूत्रांनी सांगितले की, इस्लामाबादने जम्मू आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्यानंतर भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने एक पाकिस्तानी एफ-१६ आणि दोन जेएफ-१७ विमाने पाडली. सूत्रांनी सांगितले की, भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) देखील पाडली. हा हल्ला पाकिस्तानच्या सीमेवर झाला.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील उधमपूर आणि राजस्थानमधील जैसलमेर येथेही ड्रोन हल्ले उधळण्यात आले आणि अखनूरमध्ये एक ड्रोन पाडण्यात आला. पूंछमध्ये दोन कामिकाझे ड्रोनही पाडण्यात आले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. पहलगाम हल्ला, त्यानंतरचं ऑपरेशन सिंदूर यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती भागात सातत्यानं हवाई हल्ले केले जात आहेत. प्रत्युत्तरादाखल भारतानंही कारवाई सुरु केली आहे. पाकिस्तानची संपूर्ण हवाई सुरक्षा यंत्रणा , चार लढाऊ विमानं आणि एक हायटेक AWACS उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. अत्याधुनिक AWACS उद्ध्वस्त झाल्यानं पाकिस्तानी सैन्याला मोठा धक्का बसला आहे. सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष चिघळला आहे.
AWACS चा फुलफॉर्म Airborne Warning and Control System असा आहे. AWACS एक खास प्रकारचं विमान आहे. त्यावर एक मोठं गोलाकार रडार लावलेलं असतं. हे रडार अतिशय दूरपर्यंत काम करतं. शत्रूची विमानं, ड्रोन, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रं आणि जमिनीवर सुरु असलेल्या हालचाली टिपण्याची ताकद AWACS मध्ये असते. त्यामुळेच याला आकाशातील नेत्र असंही म्हटलं जातं. टेहळणी करण्यासोबतच आपल्या लढाऊ विमानांना दिशा दाखवण्याची आणि शत्रूपक्षाची माहिती देण्याची कामगिरीही AWACS पार पाडते. भारतानं पाकिस्तानची हीच यंत्रणा उद्ध्वस्त केल्यानं ऐन संघर्षाच्या काळात पाकिस्तानला दणका बसला आहे.
विमानावर असलेली AWACS ३६० डिग्रीपर्यंत फिरु शकतं. ही यंत्रणा शेकडो किलोमीटरपर्यंत पाहू शकते. शत्रूच्या विमानांना अतिशय सहजपणे ओळखते. त्यामुळे कोणत्याही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे AWACS उद्ध्वस्त होणं पाकिस्तानला भारता विरूद्धच्या संघर्षात बॅकफूटवर ढकलणार आहे.
AWACS चं मुख्य काम हवाई टेहळणी करणं असतं. आकाशात काय घडतंय, कोणती विमानं कुठून उड्डाणं करत आहेत, याकडे AWACSचं लक्ष असतं. आपल्या आसपास असलेल्या लढाऊ विमानांना सूचना देण्याची कामगिरी AWACS कडून पार पाडली जाते. त्यामुळे युद्धकाळात लढाऊ विमानांना मोठी मदत होते. कुठे जायचंय, कोणाला रोखायचंय, कोणावर हल्ला करायचाय, याच्या सूचना AWACSकडून अन्य विमानांना दिल्या जातात.