CongressNewsUpdate : माझ्या भावाला आरक्षण विरोधी म्हणता , मोदीजी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा तोडून जातिजनगणचे आव्हान स्वीकारा ….

नागपूरमधील प्रियांका गांधी यांच्या रोड शो दरम्यान मोठा राडा, काँग्रेस – भाजपचे कार्यकर्ते भिडले ….
नागपूर : नागपूरमधील प्रियांका गांधी यांच्या रोड शो दरम्यान मोठा राडा झाला आहे. रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा प्रचार हिंदूविरोधी आहे असे म्हणत रॅलीमध्ये भाजपचे झेंडे मिरवले तसेच आक्रमक होत घोषणाबाजी केली. यामुळे भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. परिणामी रोड शो दरम्यान कार्यकर्ते भिडल्याने काही काळासाठी वातावरण तापले होते.
यावेळी बोलताना प्रियांका गांधी यांनी , राहुल गांधी यांनी जातिजनगणना व्हायला हवी, सगळ्यांना न्याय मिळायला हवा, असे म्हटले की, त्यांच्यावर टीका केली जाते. मोदींनी दहा वर्षात काही केले नाही, पण माझ्या भावाने आरक्षणाची मर्यादा हटवणार म्हटले की, त्याला आरक्षणविरोधी ठरविले जाते. तुम्ही माझ्या भावाला आरक्षण विरोधी म्हणत आहात तर तुम्ही एकदा मंचावरुन ५० टक्के आरक्षणाची मर्यादा तोडणार आणि जातिजनगणना करणार असे जाहीर करुन दाखवा, असे खुले आव्हान दिले तसेच काँग्रेसच्या काळात कपाशीला ८ हजार भाव मिळत होता, आता ६ हजार रुपये मिळतो, तेच सोयाबीनचे झाले आहे. दूध उत्पादक, कांदा उत्पादक अडचणीत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू, औषधे महाग करुन ठेवली आहेत. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला. आपण पुढे जायच्याऐवजी मागे जात आहोत.
दरम्यान, भाजपाने उद्योगपतींची कर्जे माफ केली पण शेतकऱ्यांची कर्जे माफ केली नाहीत, आदिवासींना सोयी सुविधा सवलती मिळाल्या नाहीत. भाजपाकडून छत्रपती शिवरायांचाही अपमान झाला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही पंचसूत्री लागू करु तसेच राज्यातील रिक्त अडील लाख सरकारी जागा भरु, असा शब्द प्रियंका गांधी यांनी दिला.
नागपूर पश्चिमचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियांका गांधी यांचा रोड शो आयोजित कऱण्यात आला होता. रोड शो दरम्यान कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक देखील सहभागी झाले होते. प्रियांका गांधी यांचा रोड शो संघाच्या मुख्यालयाजवळ येणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाली होती. यासाठी भाजपचे कार्यकर्ते सकाळपासून तेथे जमले होते. काँग्रेस कार्यकर्ते देखील तयारीत होते. रोड शो संपल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते देखील बडकत चौकात आले आणि दोन्ही बाजू्च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केल्याची माहिती आहे.