जरांगे यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी, राज्यातील २३ मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांची मोठी गर्दी ….

जालना : आंतरवाली सराटीमध्ये राज्यातील २३ मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांनी गुरुवारी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. उर्वरित जिल्ह्यातील इच्छुक दुसऱ्या टप्प्यात येणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांशी चर्चा करण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
जरांगे पाटील म्हणाले, कुठे उभे करायचे, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात उमेदवार उभे न करता तेथे कुणाला पाठिंबा द्यायचा आणि कुठे उमेदवार उभे न करता पाडायचे यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. मतदारसंघात एकच उमेदवार उभा करावा, असे आपण सर्वांना सांगितले आहे. महायुतीमध्ये ज्यांना उमेदवारी मिळाली ते आणि ज्यांना उमेदवारी मिळाली नाही तेही पाठिंबा मागण्यासाठी येत आहेत. २५, २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा आपण निवडणुकीची समीकरणे जुळण्याच्या संदर्भात समाज बांधवांशी चर्चा करणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघातून १५ जणांचा गट उमेवारी मागण्यासाठी आला होता. त्यांना एक उमेदवार नक्की करुन आणा असे सांगण्यात आले. त्यांनी खूप वेळ चर्चा केली. उत्तर काही सापडले नाही. मग ते आपण पुन्हा चर्चा करू असे म्हणून निघून गेले.बहुतांश मतदारसंघातील चर्चा अशाच पद्धतीने होत होती. जरांगे यांच्या पोलीस बंदोबस्तामध्येही गुरुवारी वाढ करण्यात आली होती.
मनोज जरांगे यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी….
दरम्यान,मनोज जरांगे यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एका युट्यूब चॅनेलच्या कमेंटमधून ही धमकी देण्यात आल्याने ऐन निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण केले जात आहेत.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना अज्ञाताकडून धमकी देण्यात आली आहे. एका युट्यूब चॅनलच्या कॉमेंटमध्ये अज्ञाताकडून ही धमकी देण्यात आली असून कॉमेंटचा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार अशा आशयाची ही धमकी असल्याचं कॉमेंटमध्ये लिहिण्यात आलं आहे. बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाऊंटवरुन ही धमकी दिली जात आहे. त्यामळे, मनोज जरांगेंच्या भेटीसाठी येणाऱ्या उमेदवारांची किंवा बैठकी दरम्यान आतमध्ये जाणाऱ्या सर्वांची आता तपासणी केली जाणार असल्याचे समजते. दरम्याान, मनोज जरांगे सध्या बसत असलेल्या सरपंच मळा येथील बैठकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
29 किंवा 30 तारखेला मतदार संघ जाहीर करू….
दरम्यान, प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच जणांनी फॉर्म भरून ठेवायचे आहेत. 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ जाहीर करू. तेव्हाच उमेदवार ही जाहीर करू. चिन्ह आल्याशिवाय उपयोग नाही,असं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर, 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येईल.
एकच उमेदवार दिल्यावाचून पर्याय नाही…
काही मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितल्यानंतर आता एकच उमेदवार दिल्यावाचून पर्याय नाही असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत. प्रत्येकालाच उभं राहायचं आहे. त्यामुळे मी सर्वांना बोलून घेईन. ज्यांनी ऐकले नाही त्यांच्यावर मी नाराज होणार नाही. सर्वांनी 30-40 दिवस कष्ट घेतले तर पाच वर्ष सर्व जनता आनंदी राहील असं जरांगे म्हणालेत. दरम्यान आज, जरांगे उमेदवार जाहीर करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.. ते म्हणाले, सर्वांना हात जोडून विनंती करणार एकच जण उभे रहा.. किती मतदारसंघ काढायचे हे आज जाहीर करायचे नाही.
ज्यांना उमेदवारी अर्ज भरून ठेवायचे त्यांनी ते भरून ठेवावेत. अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर उमेदवार कोणता ठेवायचा ते जाहीर करू आणि इतरांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येईल. कोणत्या मतदार संघात निवडणूक लढवायची ते आजच सांगता येणार नाही. ३० ऑक्टोबर रोजी म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकानंतर हे स्पष्ट करण्यात येईल, असेही जरांगे पाटील म्हणाले. केवळ एका जातीवर निवडणुकीत यश मिळणार नाही.
केवळ एकाच जातीच्या आधारे निवडणूक जिंकता येणार नाही. त्यामुळे पुढील तीन दिवस आपण अन्य जातींबरोबरची समीकरणे जुवळून आणण्यासाठी पुढील दोन दिवस काम करणार असल्याचे जरांगे यांनी शुक्रवारी सांगितले. पुढील काळात किती मतदारसंघात उमेदवार उभे करायचे आणि किती मतदारसंघात पाडायचे याचा हिशेब मांडला जाईल हे ठरवू असेही ते म्हणाले.
मराठा बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय
अंतरवाली सराटी इथं झालेल्या मनोज जरंगे पाटील यांच्या सकल मराठा समाज बैठकीतील तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार
1. जी जागा जिंकून येऊ शकते अशा ठिकाणी उमेदवार उभे करणार.
2. SC आणि ST ठिकाणी जो आपल्याशी बांधील असेल त्यांना आपण लाखभर मतं /पाठिंबा द्यायचा.
3. जिथे आपण उमेदवार देणार नाहीत,तिथे जो बॉण्डवर लिहून देईल की आपल्याला आरक्षण देणार त्याला आपण साथ देऊ.