MarathawadaNewsUpdate : शरद पवार , महाराष्ट्राला संभाळणार्रे एकमेव नेते : खा. बजरंग सोनवणे

बीड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. महाविकास आघाडीत जवळपास ८० टक्के जागावाटप निश्चित झाले असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. यातच खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेकांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत खासदार बजरंग सोनावणे यांनी माहिती दिली.
या विधानसभेला आपल्या जागा निवडून आणण्यासाठी काय करता येऊ शकेल, यासाठी पूर्ण तयारीला लागायला हवे, यांसदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रात आता परिस्थिती अशी आहे की, शरद पवार यांच्याकडे येणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. शरद पवार असे नेते आहेत की, जे महाराष्ट्राला सांभाळू शकतात, अशी भावना जनतेची आणि सर्वांची आहे. त्यामुळेच शरद पवार यांच्याकडे येण्याची इच्छा अनेक जण दाखवत आहेत. त्याचा निर्णय जयंत पाटील आणि शरद पवार घेतील, असे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी सांगितले.
सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत जिंकतील
पत्रकारांशी बोलताना बजरंग सोनावणे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे यांचा इम्पॅक्ट मराठवाड्यात दिसून येईल का, असा प्रश्न पत्रकारांनी बजरंग सोनावणे यांना केला. या प्रश्नाला उत्तर देताना, राजकारणाचा विचार केल्यास जरांगे पाटील साहेबांचा इफेक्ट नक्कीच मराठवाड्यात दिसून येणार म्हणजे येणारच आहे. त्याबाबत कुणाचे दुमत असायचे कारण नाही, असे स्पष्ट करत, बीड जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत जिंकतील, असा दावा बजरंग सोनावणे यांनी केला.
मागील १० वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात तुमचीच सत्ता
मागील काही महिन्यांत बीड जिल्ह्याच्या नेतृत्वाने ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात आजवर त्यांनी कोणतीही विकासकामे केली नाही. त्यामुळे स्थानिक समाजाचे, नागरिकांचे पाठबळ त्यांना कमी झाल्याचे वाटले. मला लोकसभा निवडणुकीत सर्व समाजाच्या नागरिकांनी मतदान केल्याने मी निवडून आलो आहे. मागील १० वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात तुमचीच सत्ता आहे. जर खरेच तुम्ही विकास केला असे म्हणताय ना, तर या कालावधीत बीड जिल्ह्यासाठी पाणी आणयाला पाहिजे होते. मात्र ते काम काही केले नाही, असे सांगत बजरंग सोनावणे यांनी टीकास्त्र सोडले.
दरम्यान, दसरा मेळाव्यात उपस्थित जनसमुदायाला भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, आता कोयता घासून ठेवा, आता आपल्याला खेळ खेळायचा आहे. त्यावर बोलताना, मागील दोन पिढ्या नुसता कोयता घासून ठेवायला सांगतात. बीड जिल्ह्यातील जनतेला कधी तरी ऊस पण लावायला सांगा ना, नुसता कोयता घासून तोडायला लावता, त्यावरच भांडवल करून राजकारण करत आला आहात, हे कुठे तरी थांबले पाहिजे, या शब्दांत बजरंग सोनावणे यांनी निशाणा साधला.