अहमदनगर : आंतरजातीय विवाहातून झालेल्या जळित प्रकरणाचा गुंता वाढला

अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथील मंगेश चंद्रकांत रणसिंग व रुक्मिणी रणसिंग यांच्या आंतरजातीय विवाहानंतर त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केलेल्या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले असल्याने या प्रकरणात गुंता निर्माण झाला आहे.
आतापर्यंत रुक्मिणीचे वडील, काका व मामानेच या दोघांना पेट्रोल टाकून जाळल्याचा आरोप आहे; मात्र, रुक्मिणीच्या सहा वर्षांच्या भावाने दिलेल्या जबाबात मंगेशनेच रुक्मिणीला पेट्रोल टाकून जाळल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी मंगेशच्या भावांचीही चौकशी केली. दरम्यान, या प्रकरणातील रुक्मिणीचे वडील, काका व मामाविरोधात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले असून, मुलीचे वडील रामा भरतिया यांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली आहे.
मंगेश रणसिंग व रुक्मिणीचा सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. महाराष्ट्रदिनी मंगेश व रुक्मिणी यांना रुक्मिणीचे वडील रामा भरतिया, काका सुरेंद्रकुमार भरतिया व मामा घनश्याम राणेंज यांनी जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब रुक्मिणी व मंगेशने दिला होता. पारनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर रुक्मिणीचे मामा व काका यांना पोलिसांनी तातडीने अटक केली होती.
मात्र रुक्मिणीचा भाऊ नंचूने सांगितले, ‘मंगेश रुक्मिणीला सतत मारहाण करायचा. त्यामुळे रुक्मिणी माहेरी आली होती. मंगेश घरी येऊन रुक्मिणीला मारहाण करील, या भीतीमुळे आई तिच्यासह भावंडांना घरात कोंडून कामावर जात असे. माळवदाच्या घराची मागील बाजू मोडकळीस आली होती. घटनेच्या दिवशी मंगेश हातात पेट्रोलची बाटली घेऊन मागील बाजूने घरात शिरला. मंगेशने रुक्मिणीला मारहाण केली. तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवले. त्यावेळी आम्ही कोपऱ्यात बसून आरडाओरडा केला. मंगेशने पेटवल्यानंतर रुक्मिणीने जीव वाचवण्यासाठी त्याला मिठी मारली. त्यामुळे मंगेशही भाजला. आमचा आरडाओरडा, घरातून येत असलेला धूर पाहून शेजारी आले व टिकावाने घराचा दरवाजा तोडला.’
दरम्यान, उपचारादरम्यान रुक्मिणीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या बचावासाठी तर ननंचूच्या तोंडी हा जबाब आला नसेल ना, याचीही शक्यता पोलिसांकडून पडताळली जात आहे. घटनास्थळावरून गोळा करण्याते आलेले पुरावे व साक्षीदारांच्या जबाबावरून पोलिसांचा तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे रुक्मिणीने मृत्यूपूर्व जबाब कुणाच्या दडपणाखाली दिला का याचीही चौकशी करण्यात येत आहे. रुक्मिणी गर्भवती असल्याचे सांगण्यात येते. वैद्यकीय आहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होईल. त्यामुळे यातील आरोपी विरोधात गुन्ह्यांचे वाढीव कलम लावण्यात येईल.