मोदींना बहुमत मिळण्याची शक्यता कमी, त्यामुळे नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी

या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा’ अशी मागणी भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या जनता दल युनायटेड(जेडीयू)चे वरिष्ठ नेते आणि आमदार गुलाम रसूल बलियावी यांनी केली आहे. मोदींना बहुमत न मिळाल्यास आणि मित्र पक्षांच्या मदतीनं एनडीएचं सरकार आल्यास नितीश कुमार यांना पंतप्रधान करावं, असं गुलाम रसूल बलियावी म्हणाले आहेत.
गुलाम रसूल बलियावी बिहारचे प्रमुख मुस्लिम नेते आहेत . एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. राज्यात मोदींच्या चेहऱ्यानं नव्हे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चेहऱ्याकडे पाहून काम करतोय. त्यामुळेच बिहारमधली जनता एनडीएला मतदान करतेय. या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा’, अशी मागणी गुलाम रसूल बलियावी यांनी केली.
बलियावी यांच्या मागणीवर भाजपकडून अद्याप कोणीही बोललेलं नाही. मात्र या मागणीमुळे भाजपा व जदयूमध्ये पुन्हा दुरावा निर्माण होऊ शकतो, अशीही शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यामुळे नितीश कुमार हे भाजपाची साथ सोडत एनडीएमधून बाहेर पडले होते. त्यावेळीही नितीश यांना पंतप्रधान पदाची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, अशीही चर्चा होती.