आयएनएस विराट बाबत राजीव गांधी यांच्यावरील मोदींचे आरोप सपशेल खोटे : अॅडमिरल एल. रामदास

गांधी कुटुंबांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर सुट्टी घालविण्यासाठी केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला होता. मोदींनी गांधी कुटुंबियावर केलेल्या या आरोपात तथ्य नसल्याचे नौदलाचे निवृत्त अधिकारी अॅडमिरल एल. रामदास यांनी सांगितले आहे. एल. रामदास यांनी एका पत्रकाद्वारे तपशीलवार माहिती देत मोदींचा दावा फेटाळून लावला आहे. आयएनएस विराटवर सेवा बजावणाऱ्या नौदलाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडील माहिती घेऊन त्याआधारे रामदास यांनी हे पत्रक जारी केले आहे.
विराट युद्धनौकेचा वापर राजीव यांनी कौटुंबिक सहलीसाठी केल्याचा दावा खोटा असल्याचे रामदास यांनी पत्रकात म्हटले आहे. राजीव गांधी यांच्या त्या अधिकृत शासकीय दौऱ्यात त्यांच्या पत्नीशिवाय कुटुंबातील अन्य सदस्य नव्हते. त्यावेळी खबरदारी म्हणून राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नीसाठी एका हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती.
‘लक्षद्वीप बेटावर मोदी यांनी खासगी दौऱ्यासाठी १० दिवसांसाठी विराट युद्धनौकेचा वापर केला होता.’ या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर आरोप केले असतील, अशी शक्यता एल. रामदास यांनी व्यक्त केली आहे.
मोदी यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करताना रामदास यांनी पत्रकात खुलासा केला आहे. ३२ वर्षापूर्वी झालेला घटनाक्रम त्यांनी यामध्ये नमूद केला आहे. नौदलाचे तक्तालिन कॅप्टन आणि निवृत्त व्हाईस अॅडमिरल विनोद पसरिचा, अॅडमिरल अरूण प्रकाश, आणि व्हाईस अॅडमिरल मदनजीत सिंह यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रामदास यांनी मोदींचा दावा खोडून काढला आहे.