काँग्रेसची दिल्लीतील सातही जागी अनामत रक्कम जप्त होणार : केजरीवाल

दिल्लीत प्रचारासाठी येऊन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी केवळ त्यांचा वेळ वाया घालवत आहेत. कारण, दिल्लीत काँग्रेस लढवत असलेल्या सातही जागांवर त्यांची अनामत रक्कम जप्त होणार आहे, असे दिल्लाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. प्रियंका यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये लक्ष घालावे, जिथे त्यांच्या पक्षाची थेट भाजपशी लढत आहे. असा सल्लाही यावेळी केजरीवाल यांनी दिला.
केजरीवाल म्हणाले की, त्या वेळ वाया घालवत आहेत, मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये त्या का प्रचार करत नाहीत. उत्तर प्रदेशात सपा-बसपा विरोधात तर दिल्लीत आम आदमी पक्षाविरोधात त्या रॅली काढत आहेत. मात्र, दोघेही भाऊ-बहिण त्यांची जिथे भाजपशी थेट लढत आहे, त्या ठिकाणी जात नाहीत.
प्रियंकांनी उत्तर-पूर्व आणि दक्षिण दिल्ली लोकसभा मतदार संघात बुधवारी रोड शो करून, काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला. दिल्लीत रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, २३ मे रोजी निकाल आहे.