अमित शाह यांच्या सभेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटोच नाही , मिटकरींनी नवनीत राणा यांना दिला इशारा..

अमरावती : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेपूर्वीच अमरावतीमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळत आहे. महायुतीतील राष्ट्रवादी गट नवनीत राणा यांच्यावर संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन नवनीत राणांना इशाराच दिला आहे. अमित शाह यांच्या सभेपूर्वीच आमदार मिटकरी संतापले आहेत.
अमित शाह यांनी मंगळवारी अकोल्यात सभा घेतली, त्यानंतर आज नवनीत राणा यांच्या सभेसाठी ते अमरावतीमध्ये दाखल होत आहेत. अमरावतीमध्ये गृहमंत्र्यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून भाजपा पदाधिकारी व राणा दाम्पत्य कामाला लागले आहे. सभेसाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मोठा डिजिटल लावण्यात आला आहे. मात्र, आता या डिजिटल फ्लेक्सवरुनच वाद रंगल्याचे दिसून येते. कारण,आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन येथील सभामंडपाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
असं नाही.. नीट रडायचं !
मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल. https://t.co/2jjkk3deBD— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) April 24, 2024
या व्हिडिओसोबत त्यांनी थेट नवनीत राणांना इशाराही दिला आहे. ”नवनीत राणाजी आपण महायुतीचा धर्म विसरला आहात. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा निवडणुकीत याची मोठी किंमत मोजावी लागेल.”, अशा शब्दात अमोल मिटकरींनी राणा यांना इशारा दिला आहे. तर मिटकरींचा हा व्हिडिओ रिट्विट करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही अमोल मिटकरींना चिमटा काढला आहे. असं नाही.. नीट रडायचं ! असे म्हणत प्रशांत जगताप यांनी मिटकरींना डिवचलं आहे.
काय आहे नेमका वाद ?
नवनीत राणा यांच्या सभेसाठी अमरावतीमधील सायन्सकोर मैदानावर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मोठा डिजिटल फ्लेक्स दिसून येत आहे. या फ्लेक्सवर अमित शाह यांची जाहीर सभा असा आशय लिहिला आहे. मात्र, फ्लेक्सवर दिसत असलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उमेदवार नवनीत राणा एका बाजुला आहेत. तर, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या बाजुला दिसत आहेत. महायुतीच्या उमेदवारासाठी सभा असतानाही या फ्लेक्सवर अजित पवारांचा फोटो नाही, त्यामुळे अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त करत महायुतीची आठवण करुन दिली आहे.
शरद पवार गटाने काढला चिमटा
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांनी शेअर करत मिटकरींना चिमटा काढला. असं नाही.. नीट रडायचं ! मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल, अशी फिरकी मिटकरींची घेतली आहे. त्यामुळे, आता महायुतीच्या उमेदवारासाठी होत असलेल्या सभेत अजित पवारांचा फोटो झळकतो की नाही, हेच पाहावे लागेल.