मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रसंघानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणं हा भारताचा मोठा विजय : नरेंद्र मोदी

‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रसंघानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणं हा भारताचा मोठा विजय आहे. सव्वाशे कोटी जनतेच्या सामूहिक शक्तीचं हे फलित आहे. ही तर फक्त सुरुवात आहे… आगे आगे देखिए होता है क्या…’ अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. जयपूर येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. ‘मसूदला दहशतवादी घोषित करण्यास उशीर झाला, पण न्याय झाला,’ असं मोदी यावेळी म्हणाले.
दहशतवादाच्या विरोधात भारत लढत असलेल्या लढाईला पाठिंबा देणाऱ्या देशांचे मोदींनी आभार मानले. मसूदच्या निमित्तानं मोदींनी काँग्रेसवर शरसंधान केलं. ‘काही वर्षांपूर्वी देशातील सरकार रिमोट कंट्रोलवर चालायचे. खुद्द पंतप्रधानांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नव्हता. याउलट आजची परिस्थिती आहे. संयुक्त राष्ट्रसंघात काय झालं हे आज संपूर्ण देशानं पाहिलं. देशातील सव्वाशे कोटी जनता संयुक्त राष्ट्रसंघात गर्जत आहे. हाच नवा भारत आहे. ज्याचा आवाज संपूर्ण जगात ऐकला जातो,’ असंही मोदी म्हणाले.
‘आमचं सरकार भारताचा आवाज जागतिक पातळीवर पोहोचवण्याचं काम करत होतं, तेव्हा काही लोक ट्विट करून माझी खिल्ली उडवत होते. आज त्यांना आमच्या सरकारच्या त्या कामाचं महत्त्व पटलं असेल. मात्र, हे यश केवळ मोदींचं नसून संपूर्ण देशाचं आहे. भारतासाठी आज अभिमानाचा दिवस आहे. देशात उत्साहाचं वातावरण आहे. राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर राजकारण करून देशातील उत्साहाचं वातावरण खराब करू नये,’ असं आवाहन त्यांनी केलं. ‘पाकिस्तानातील एक छोटा समूह आज दहशतवादाच्या विरोधात बोलू लागला आहे. हाच समूह दहशतवादाच्या मुदद्यावर पाकिस्तान सरकारवरही दबाव आणेल, असा विश्वास त्यांनी केला.