ParliamentNewsUpdate : संसदेतील तरुणांच्या गोंधळानंतर कोण काय म्हणाले ?

नवी दिल्ली : ज्या वेळी सागर आणि मनोरंजन यांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली, त्यावेळी शून्य तास सुरू होता आणि पश्चिम बंगालमधील मालदा येथील भाजप खासदार खगेन मुर्मू बोलत होते. लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना खासदार मनोज कोटक आणि मलूक नगर यांनी पकडले आणि त्यानंतर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकारच्या प्राथमिक तपासानंतर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, नीलम आणि अनमोलकडे कोणतीही बॅग किंवा ओळखपत्र नव्हते. त्यांनी कोणत्याही संघटनेशी संबंध असल्याचा इन्कार केला. आपले ऐकले जात नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले.
दरम्यान दुसरीकडे, लोकसभेच्या सुरक्षेचा भंग करणाऱ्या लोकांची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे दहशतवाद विरोधी युनिट संसदेत पोहोचले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या लोकांची अनेक एजन्सीकडून चौकशी केली जाऊ शकते.
प्रत्यक्षदर्शी मोहन दानप्पा काय म्हणाले?
प्रेक्षक गॅलरीत उपस्थित प्रत्यक्षदर्शी मोहन दानप्पा यांनी सांगितले की, आम्ही लोकसभेचे कामकाज पाहण्यासाठी आलो होतो. आम्ही पहिल्या गॅलरीत होतो. आरोपी गॅलरी दोनमध्ये होता. त्याने अचानक गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि स्मोक बॉम्ब फोडले. खासदारांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला, यानंतर आरोपीला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले….
बैठकीनंतर लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, विविध पक्षांच्या नेत्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, 13 डिसेंबर रोजी संसदेवर हल्ला करण्याचा कट दहशतवादी संघटना आखत असल्याचे सार्वजनिक माहिती होते आणि सरकारलाही याची माहिती होती, तरीही सुरक्षेमध्ये ही त्रुटी कशी काय घडली?
In a chilling reminder to the Parliament attack 21 years back on the same day (Dec 13), a man jumped from visitors’ gallery into Lok Sabha MPs area. The breach could’ve put lives of MPs in danger. It has exposed chinks in the 56inch armour. The man was a guest of @BJP4India MP. pic.twitter.com/qhPX4C4Dia
— Kunwar Danish Ali (@KDanishAli) December 13, 2023
’56 इंची चिलखतातील त्रुटी उघड’ : दानिश अली
दरम्यान, याप्रकरणी बसप खासदार दानिश अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “21 वर्षांपूर्वी याच दिवशी (13 डिसेंबर) संसदेवर हल्ला झाला होता. आज लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून एका व्यक्तीने खासदारांच्या परिसरात उडी मारली. सुरक्षेतील ही चूक खासदारांच्या जीवावर बेतू शकते. धोका आहे.” याने 56 इंचाच्या चिलखतीतील त्रुटी उघड केल्या आहेत. संसदेत प्रवेश करणारी व्यक्ती भाजप खासदाराची पाहुणी होती.
हा एक भयानक अनुभव होता…
तृणमूलचे खासदार सुदीप बॅनर्जी म्हणाले की, हा एक भयानक अनुभव होता. खासदारांमध्ये दोन जणांनी अचानक उड्या मारल्या. ते सतत पुढे जात होते. काही वेळातच त्याच्या हातात धुरकट टॉर्च दिसू लागली. आम्ही सगळे घाबरलो होतो. मात्र, नंतर खासदारांनी त्याला पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.
खासदार डिंपल यादव म्हणाल्या….
दरम्यान, समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव म्हणाल्या की, येथे जो कोणी येतो, मग तो प्रेक्षक असो वा पत्रकार, त्यांना टॅग नाही. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे. ही सुरक्षेतील पूर्ण चूक आहे. त्यामुळे लोकसभेत काहीही होऊ शकले असते.
खासदार कार्ती चिदंबरम यांनी सांगितले….
दरम्यान, काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी सांगितले की, सुमारे 20 वर्षे वयाच्या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि त्यांच्या हातात टीनचे डबे होते, ज्यातून पिवळा धूर निघत होता. हा धूर विषारीही असू शकतो. त्यापैकी एक जण सभापतींच्या खुर्चीकडे धावण्याचा प्रयत्न करत होता. “संसदेवरील हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त हा सुरक्षेचा गंभीर उल्लंघन आहे.”
विरोधी आघाडी ‘इंडिया’ची आज बैठक
विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) गुरुवारी (14 डिसेंबर) संसदेच्या सुरक्षेतील उल्लंघनाबाबत बैठक घेणार आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याच्या विचारात आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचे टीएनसी नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी सांगितले.