GujratRainUpdate : गुजरातमध्ये अवकाळी पावसाचे 25 बळी , जनजीवन विस्कळीत, पिकांचे नुकसान

अहमदाबाद : गुजरातमधील विविध भागात अवकाळी पावसात वीज पडून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितले की स्थानिक प्रशासन मदत कार्यात गुंतले आहे.
गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये अवकाळी पावसामुळे गेल्या 24 तासांत किमान 25 जणांचा मृत्यू झाला असून येत्या 72 तासांत आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (SEOC) च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या वेगवेगळ्या भागात पावसामुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. SEOC ने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी गुजरातमधील 252 पैकी 234 तालुक्यांमध्ये पाऊस झाला. सुरत, सुरेंद्रनगर, खेडा, तापी, भरूच आणि अमरेली जिल्ह्यात १६ तासांत ५०-११७ मिमी पावसाची नोंद झाली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि पिकांचे नुकसान झाले.
राजकोटच्या काही भागात गारपीट झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसामुळे पिकांच्या नुकसानाव्यतिरिक्त, सौराष्ट्र विभागातील मोरबी जिल्ह्यातील कारखाने बंद झाल्यामुळे सिरेमिक उद्योगावरही परिणाम झाला आहे. IMD च्या अहमदाबाद केंद्राच्या संचालिका मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, सोमवारी पाऊस कमी होईल आणि दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र जिल्ह्यांच्या काही भागात तो केंद्रित असेल.