शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांचे मोदी प्रेम : पुन्हा मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर आत्महत्या करण्याचा निर्धार

नरेंद्र मोदी २०१९ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर मी अयोध्येत जाऊन आत्महत्या करेन असे खळबळजनक विधान शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केले आहे. तसेच कट्टरवाद्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या या भुमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रिझवी म्हणाले, राष्ट्र हे कोणत्याही धर्मापेक्षा मोठे असते. मी जेव्हा राष्ट्रहिताची गोष्ट करतो तेव्हा मला कट्टरवादी लोक जीवे मारण्याची धमकी देतात. मोदी सरकार सत्तेतून जाऊ द्या तुमचे तुकडे-तुकडे करु अशा आपल्याला धमक्या येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जे देशप्रेमी आहेत त्यांच्या मनात नरेंद्र मोदींबाबत प्रेम आहे आणि देशद्रोह्यांच्या मनात भीती आहे. मोदी देशाचे उत्कृष्ट पंतप्रधान आहेत. जर २०१९ मध्ये जर मोदी पंतप्रधान झाले नाहीत आणि इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता देशद्रोह्यांच्या पाठींब्याने पंतप्रधान बनला तर मी अयोध्येत राम मंदिराच्या गेटवर जाऊन आत्महत्या करने, कारण देशद्रोह्यांच्या हातून मरण्यापेक्षा मी स्वाभिमानाने मरणे पसंद करेन, असे रिझवी यांनी म्हटले आहे. कट्टरवाद्यांच्या धमक्यांमुळे रिझवी अस्वस्थ झाले असल्याचे त्यांच्या बोलण्यातून कळते, त्यांच्या या उघड भीतीयुक्त विधानामुळे प्रशासनाला देखील याची दखल घेणे भाग पडले आहे.