IndiaPoliticalUpdate : कुठलाही विषय जाहीर न करता , नव्या संसद भवनात मोदी सरकारचे विशेष अधिवेशन

नवी दिल्ली : महाराष्ट्राचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवातच मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलावल्याचा मुद्दा इंडिया आघाडीने उचलला आहे. त्यातही काँग्रेस व ठाकरे गटाने यावरून सडकून टीका केली आहे. परंतु कोणत्याही विरोधाला न जुमानता मोदी सरकारने नव्या संसद भवनात विशेष अधिवेशनाची तयारी केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एखाद्या विशेष परिस्थितीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची तरतूद घटनेत आहे हि विशेष परिस्थिती कोणती हे मात्र सरकारने सांगितले नाही.
विरोधी नेत्यांच्या म्हणण्यानुसार सध्या विक्रमी बेरोजगारी व महागाईसारख्या मुद्यांची दाहकता कायम असून त्यातच आता नवीन संसदेत स्थलांतराचा मुहूर्त आगामी अधिवेशनातून काढला जाईल अशी नवी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे रोजी नवीन संसदेचे उद्घाटन व राजदंडाची (सेंगोल) स्थापना स्वहस्ते केली होती.
दरम्यान ‘संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान होणार’, या एका ओळीशिवाय विशेष अधिवेशनाच्या आयोजनाबद्दल कोणतीही माहिती सरकारने दिलेली नाही त्यामुळे या अधिवेशनात नेमकी काय चर्चा होणार ? याचा केवळ अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.