राहुल गांधी यांचा ९० किलोमीटरचा प्रवास आणि संगमनेरमध्ये मुक्काम….

शिर्डी लोकसभेचे काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी संगमनेरकडे निघाले खरे पण विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे राहुल गांधी यांना शुक्रवारी बालासोरहून निघण्यास उशीर झाला. त्यामुळे त्यांचे विमान नाशिकला रात्री आठच्या सुमारास उतरले. पुढचा प्रवास संगमनेरकडे असल्याने तसेच रात्री हेलिकॉप्टरनेही जाता येत नसल्याने त्यांना पुढच्या प्रवासासाठी रस्तेमार्गाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे रात्री आठच्या सुमारास ओरिसातील बालासोरहून नाशिक विमानतळावर आगमन झाल्यानंतर अतिविशेष सुरक्षा असलेल्या राहुल यांच्यासोबतच्या १८ गाड्यांचा ताफा शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाशिकच्या द्वारका सर्कलवरून संगमनेरच्या दिशेने रवाना झाला. देशातील एका मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि तेही ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तब्बल ९० किलोमीटरचा प्रवास रस्तेमार्गाने करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.
संगमनेरातील जाणता राजा मैदानावर शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान सभा संपल्यानंतर ‘सत्यजितजी देर हो गयी है. मै आज यही हॉल्ट करूंगा.’ कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या वाक्याने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना सुखद धक्काच बसला. त्यानंतर अर्थातच धावपळ सुरू झाली. राहुल यांच्याकडे रात्री बदलण्यासाठी कपडे नव्हते. रात्री साडेअकरा वाजता संगमनेर मधील एका कापड दुकानातून त्यांनी शॉर्ट, टी शर्ट खरेदी केले. अंगावरचे कपडे रात्रीच धुवून सकाळसाठी तयार केले. संगमनेर येथील अमृत वाहिनी कॉलेज येथील अमृत कुटीच्या एका लहानशा गेस्ट हाऊसमध्ये राहुल गांधीचा काल रात्री अचानक मुक्काम झाला असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे.
या वृत्तात म्हटले आहे कि , थोरात, तांबे कुटुंबियासह काँग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधींच्या साधे व सहजपणाचा अनुभव आला. सुरक्षा रक्षकांना रात्र जागून काढावी लागली. रात्री मुक्कामी असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, सत्यजीत तांबे व डॉ. हर्षल तांबे इतक्या मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत राज्याच्या राजकारणातील अनेक गप्पा गोष्टी झाल्या. त्यांच्या आकस्मिक मुक्कामामुळे सर्वच नेत्यांना त्यांच्यासोबत मनमोकळेपणानं बोलता आलं. रात्री त्यांनी आवर्जून मराठमोळं जेवण घेतलं. त्यामधे पिठलं व भाकरीचा आस्वादही घेतला. सकाळी राहुल यांनी दही व थालपिठावर ताव मारला. रात्री धुतलेली कपडेच घालून आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ते आमदार थोरात यांच्यासह हेलिकॉप्टरने मुंबईकडे दिवसभराच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.
दरम्यान, संगमनेरच्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांमधे राहुल गांधी यांचा अकस्मात झालेला मुक्काम कौतुक व अभिमानाचा विषय ठरला आहे. यासर्व घडामोडी संगमनेरची मान उंचावणार्या आणि भविष्यात संगमनेरच्या माध्यमातून जिल्ह्याला पहिल्यांदाच राज्यातील मोठी संधी देणार्या ठरणार आहेत.