वेरूळचे कैलास लेणे आले २० रुपयाच्या नव्या नोटेवर

वेरूळचे कैलास लेणे असलेली २० रुपयाची नवी नोट भारतीय चलन व्यवस्थेमध्ये लवकरच दाखल होणार आहे. रिझव्र्ह बँकेकडून लवकरच नवीन वैशिष्टय़े आणि रंगातील २० रुपयांची नोट चलनात आणली जाणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत मध्यवर्ती बँकेने ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटांसह २०० रुपये, १०० रुपये, ५० रुपये आणि १० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. त्याच्याबरोबर आता लवकरच २० रुपयाची नवी नोट देखील चलनात येत आहे.
२० रुपयाच्या नव्या नोटेचा रंग हा हिरव्या आणि पिळव्या रंगाच्या मिश्रणातील रंग (हिरवट पिवळा) असेल. या नोटेवर RBI चे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे. या नोटेच्या मागील बाजूस भारताचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या वेरूळच्या कैलास लेणींचे चित्र असणार आहे. तसेच अधिकृत नोट ओळखता यावी यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा आणि खुणांचा वापर या नोटेवर करण्यात आला आहे. दरम्यान २० रुपयाच्या सध्या चलनात असलेल्या नोटांचादेखील वापर कायम राहणार आहे.
निश्चलनीकरणानंतर म्हणजे नोव्हेंबर २०१६ पासून आलेल्या नवीन नोटा या नव्या रूपातील महात्मा गांधी मालिकेतील आहेत. आधीच्या नोटेपेक्षा तुलनेने या नोटांचा आकार आणि रचना काहीशी वेगळी आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये निश्चलनीकरणातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यावेळी निर्माण झालेल्या चलनटंचाईच्या स्थितीत २० रुपयांच्या नोटा जनसामान्यांचा आधार बनल्या होत्या. रिझव्र्ह बँकेकडे उपलब्ध तपशिलानुसार, ३१ मार्च २०१६ रोजी ४९२ कोटी रकमेच्या २० रुपयांच्या नोटा चलनात होत्या. निश्चलनीकरणानंतर, चलनात असलेल्या २० रुपयांच्या नोटांचे प्रमाण दुपटीने वाढून मार्च २०१८ पर्यंत १०० कोटींवर गेले होते.