महाराष्ट्र तापला; रणरणते ऊन आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण !!

प्रमुख शहरांचे कमाल तापमान
औरंगाबाद ४२.०० अकोला ४६.४, चंद्रपूर ४५.६, अमरावती ४५.४, नागपूर ४५.२, नगर ४४.९, जळगाव ४४.४, सोलापूर ४४.३, उस्मानाबाद ४३.८, सांगली ४३, पुणे ४२.६, नाशिक ४१.७, सातारा ४१.६, कोल्हापूर ४१, महाबळेश्वर ३६, मुंबई ३४, रत्नागिरी ३३.२
येत्या २९ एप्रिलपर्यंत विदर्भाच्या बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पुण्यात पुढील दोन दिवस कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढेच राहणार असून, किमान तापमानातही वाढ होऊन ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार आहे. सोमवारनंतर उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल आणि आकाश अंशत: ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मराठवाडाv विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे शुक्रवारी तापमानाने उच्चांक गाठला. महाबळेश्वर आणि कोकण वगळता सर्व जिल्ह्यांत चाळीस अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाली. पुण्यात या हंगामातील सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक तापमान ४६.८ अंश सेल्सिअस अकोल्यामध्ये नोंदविण्यात आले. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विदर्भ व मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवत आहे . कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याने रणरणते ऊन आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत . विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज सकाळपासूनच तीव्र उन्हाच्या झळा जाणवत आहेत . दुपारनंतर वातावरण अजून तापले आहे. घामाच्या धारा आणि अंगाची लाहीलाही होणाऱ्या तीव्र झळांमुळे नागरिक अस्वस्थ आहेत . राज्यात अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, परभणीमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविण्यात आला. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे . महाबळेश्वर आणि कोकण विभाग वगळता सर्वच ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे होता. राज्यातील नीचांकी तापमान २२.६ अंश सेल्सिअस अहमदनगरमध्ये नोंदविण्यात आले.
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाने उच्चांक गाठला. शहरात गुरुवारी ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी यात वाढ होऊन ४२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. हे शहरातील एप्रिल महिन्यातील गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी तापमान ठरले. पुण्यातील किमान तापमान २३.४ अंश सेल्सिअस होते.