सत्तेत आल्यानंतर मोदींनी फसवणुकीशिवाय काहीच केले नाही : राहुल गांधी

सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना, तरुणांना मोठे स्वप्न दाखविले होते. परंतु प्रत्यक्षात काहीच केले नाही. केवळ फसवणूक केली. मात्र, आम्ही पूर्ण अभ्यास करून तयार केलेली न्याय योजना घेऊन येत आहोत. त्यातून गरिबांना न्याय, अर्थव्यवस्थेला चालना आणि नोकऱ्या उपलब्ध होतील, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये सभा झाली. त्यावेळी राहुल गांधी बोलत होते.
गरिबांसाठी काही तरी करायचे आहे. वृत्तपत्रात वाचतो अनिल अंबानीला कर्ज दिले. मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या बँकांकडून कर्ज घेऊन पळून गेले. पंधरा लाख रुपये प्रत्येकाला द्यायचे वचन नरेंद्र मोदींनी दिले होते. भारतातील गरिब लोकांच्या खात्यावर १५ लाख रूपये जमा करणार हा नरेंद्र मोदींचा जुमला होता. माझ्यासारखे काम कोणीच नाही केले असे पंतप्रधान सांगत आहेत. देशातील लोकांना पैसे दिले नाहीत. त्यातूनच मला एका योजनेची कल्पना सूचली. पाच महिन्यांपूर्वी आमच्या टीमची बैठक घेतली. त्यांना अभ्यास करण्यासाठी पाठविले. त्यांनी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांना भेटून एक वस्तुनिष्ट योजना तयार केली. तीच आमची न्याय योजना आहे. प्रत्येक महिन्याला पाच कोटी गरिब कुटुंबाना ७२ हजार रुपये दिले जाणार आहे. पैसे देऊन २५ कोटी लोकांचे जीवन आम्ही बदलू. ७२ हजार रुपये दिल्याने देशाचा फायदा होईल.
नरेंद्र मोदींनी नोटाबंदी करून गब्बर सिंग टॅक्स( जीएसटी) लागू केला. शेतकरी, महिलांचे पैसे घेऊन बँकेत टाकले. नोटाबंदीमुळे बाजारातील खरेदी बंद केली. त्याचा उद्योगांना आर्थिक फटका बसला आहे. गरिबांना पैसे दिल्यानंतर तसेच वस्तू खरेदी करतील. त्यातून कारखाने सुरू होतील. लाखो युवकांना रोजगार मिळेल. मोदी तुम्ही पंधरा लोकांना पैसे देता तर आम्ही २५ कोटी लोकांना पैसे देऊ. गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. २०१९ निवडणुकीनंतर कर्जासाठी शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले जाणार नाही. सरकार कायदा बनवेल. शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडू. कर्जमाफ, शेतकऱ्यांना पैसे देणार असं मोदींनी सांगितले. दोन कोटी लोकांना रोजगार दिला जाईल. परंतु रोजगार देण्याएवजी मोदींनी रोजगार हिरावून घेतले आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.