भाजपची रामलीला पडद्यावरच्या नकली सीतेसारखी, पडद्यामागे जाऊन सिगारेट ओढणारी : उपेंद्र कुशवाहा

मोदींचे मंत्रिमंडळातील माजी सहकारी , एनडीए मित्रपक्षातील नेते भाजपचे अंतरंग जेवढे ओळखतात तेवढे कोणीही ओळखत नाही . भाजपविषयीचा असाच अनुभव राष्ट्रीय लोक समता पार्टीचे (आरएलएसपी) अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडताना शेअर केला आहे. ‘भारतीय जनता पक्षाची रामलीला त्या नकली सीतेप्रमाणे आहे, जी पडद्यासमोर असताना आपला माथा तिच्या पुढे झुकतो, आणि पडद्यामागे जाऊन ती सीता सिगारेट ओढते,’ असे वक्तव्य कुशवाहा यांनी केले आहे. ते दरभंगा येथील प्रचारसभेला संबोधित करत होते.
भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा कसा आहे, या बाबत बोलताना कुशवाहा म्हणाले, ‘मी सर्व जवळून पाहून आलो आहे, कारण मी एनडीएमध्ये राहून आलेलो आहे. इतकी वर्षे सारे बाहेरून पाहत होतो. आता मात्र थेट आत जाऊनच पाहून आलो. यांच्या आत काय आहे, बाहेर काय आहे हे पाहिले आहे. रामलीलेत मंच सजवला जातो. पडदा लावला जातो. जेव्हा पडदा वर जातो तेव्हा विशिष्ट व्यक्ती माता सीतेचे रूप धारण करून येते. देवीचे रूप धारण केल्यामुळे आई-बहिणींनी ते पाहिल्यावर त्या व्यक्तीपुढे त्यांची माथी झुकतात. इतका सन्मान मिळतो.’ कुशवाहा पुढे म्हणतात, ‘पडद्याच्या समोर सीतेचे रूप आणि पडद्या मागे जाऊन पाहावे तर तीच सीता सिगारेट पिताना दिसते. बस, हाच भारतीय जनता पक्षाचा चेहरा आहे. भारतीय जनता पक्षात सर्व कर्म-कुकर्म होत असते. बाहेर मात्र देव-देवतांचे रूप असते. देवीचे रुप जनतेच्या समोर मंचावर असते, आणि सिगारेटवाले रूप मी आत पाहून आलो आहे.’ लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी एनडीएला रामराम ठोकत उपेंद्र कुशवाहा यांनी एनडीएशी असलेले नाते तोडले. मंत्रिपदाचा राजीनामा देत ते थेट विरोधकांच्या महाआघाडीत सहभागी झाले. आरएलएसपीसह महाआघाडीत लालूप्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडी, काँग्रेस, माझी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्तान अवाम मोर्चा सेक्युलर आणि मुकेश साहनी यांच्या व्हिआयपी या पक्षाचा समावेश आहे.