कन्हैया कुमारला राजदने पाठिंबा द्यावा म्हणून सीपीआयचे साकडे , तनवीर हसन यांची उमेदवारी मागे घेण्याची विनंती

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून कन्हैया कुमार याचा निर्णायक विजय व्हावा यासाठी कन्हैया कुमारच्या विरोधात दिलेला उमेदवार तनवीर हसन यांची उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय) आरजेडी नेता तेजस्वी यादव यांच्याकडे केली आहे. तसेही या वेळी तनवीर हसन हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाण्याची शक्यता आहे. याचा विचार करता सीपीआयची ही विनंती मान्य करावी, असे आवाहन सीपीआयचे महासचिव सुधाकर रेड्डी यांनी केले आहे. पाटण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना कन्हैया कुमार याला समाजातील सर्वच वर्गांमधून पाठिंबा मिळत असल्याचा दावाही रेड्डी यांनी केला आहे.
सुरुवातीला कन्हैया कुमार याला समर्थन देण्याचा निर्णय आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केला होता, मात्र नंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र तेजस्वी यादव यांनी पक्षातील इतर नेत्यांच्या सल्ल्यानुसार बेगुसरायमधून तनवीर हसन यांना उमेदवारी दिली अशी चर्चा आहे. सत्तालोलुप भाजप सरकारने गेल्या ५ वर्षांच्या काळात देशाचे मोठे नुकसान केले. तसेच देशातील धार्मिक सलोखाही बिघडवला. घटनात्मक संस्थाची प्रतिष्ठा नष्ट केली. अशा परिस्थितीत डावे पक्ष केंद्रात गैर-एनडीए सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करतील, असे सुधाकर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. तनवीर हसन यांना आमचा जराही विरोध नाही. आमची लढाई त्यांच्या विरोधात नाही. त्यांनी राजकीय सन्यास घ्यावा असेही आमचे म्हणणे नाही. ते पुढे कोणतीही निवडणूक लढवण्यास मोकळे आहेत. या वेळी काँग्रेससह इतर धर्मनिरपेक्ष पक्ष कन्हैया कुमारच्या सोबत आहेत आणि त्याला समाजातील सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे असे रेड्डी म्हणाले.