‘मोदी देश चालवत आहेत की पबजी खेळत आहेत?’ : असदुद्दीन ओवेसी यांचे ट्विट

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सभेमध्ये केलेल्या वक्तव्याचा असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला. अमित शाह यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘त्यांचे हवाई दल’ पाठवून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्धवस्त केल्याचं म्हटलं होतं. त्यावर ‘मागील पाच वर्षात जे काही देशाचे होते ते सगळे मोदींचे झाले आहे. मोदी देश चालवत आहेत की पबजी खेळत आहेत?’ असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी ‘मोदींची सेना, मोदींचे हवाई दल, मोदींचा अणुबॉम्ब… पाच वर्षात जे काही देशाचे होते ते मोदींचे झाले आहे. मोदी देश चालवत आहेत की पबजी खेळत आहेत?’ असे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डललाही टॅग केले आहे. अमित शाह यांनी बंगालमधील एका सभेत राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात बोलत असताना एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकवरून मोदी सरकारची स्तुती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या हवाई दलाला आदेश देत पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला असं म्हटलं होतं. शाह यांच्या या वक्तव्यावरून ओवेसी यांनी त्यांचा समाचार घेतला.