EknathShindeNewsUpdate : निवडणूक आयोगाकडून शिंदे यांच्या ” शिवसेने”ला ढाल तलवार …

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “बाळासाहेबांची शिवसेना ” या पक्षाला ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भातील घोषणा केली आहे.
शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाला नेमके कोणते चिन्ह मिळणार याची उत्सुकता होती. काल शिंदे यांच्या गटाने याआधी सुचवलेले तीन पर्याय निवडणूक आयोगाने फेटाळून लावले होते आणि तीन नवी चिन्हे सूचवण्याची संधी दिली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून आज सकाळी निवडणूक आयोगाकडे तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड असे तीन पर्याय सूचविण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अखेर निवडणूक आयोगाने ढाल-तलवार चिन्हाला हिरवा कंदील दाखवला आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे यांना जी चिन्हे नाकारली आहेत त्याचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि , डीएमके पक्षाचे निवडणूक चिन्ह उगवता सूर्य आहे त्यामुळे तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटाला दिले गेले तर मतदारांचा मतदारांचा गोंधळ होऊ शकतो.तसेच ढाल-तलवार या चिन्हाबद्दल आयोगाने म्हटले आहे कि , ढाल-तलवार हे चिन्ह याआधी पीपल्स डेमोक्रॅटिक मोमेंट पक्षाला दिले होते. पण २००४ साली या पक्षाची नोंदणी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे हे चिन्ह उपलब्ध आहे आणि हे चिन्ह ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या गटाला देण्यात आले आहे.
आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार….
सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी #ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू #तलवार….#बाळासाहेबांची_शिवसेना
निशाणी : #ढाल_तलवार pic.twitter.com/QsatzmPdCE
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 11, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया…
दरम्यान यावर आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे कि , “केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला जो निर्णय आहे. तो आम्हाला मान्य आहे. आम्ही प्राधान्य तळपता सूर्य चिन्हाला दिलं होतं, परंतु त्यांनी आम्हाला ते चिन्ह दिलं नाही. आम्हाला ढाल तलवार त्यांनी दिली आहे आणि त्यांचा निकाल आम्हाला मान्य आहे. ढाल-तलवार ही शिवसेनेची जुनीच निशाणी आहे. आपली बाळासाहेबांची शिवसेना आहे. ही मराठमोळी निशाणी आहे. त्यामळे आता परफेक्ट काम झालेलं आहे. ढाल-तलावर ही छत्रपती शिवरायांची आणि त्यांच्या मावळ्यांची निशाणी आहे, त्यामुळे ती अगोदच सर्वत्र पोहचलेली आहे.”
आपल्या ट्विटरमध्ये शिंदे यांनी म्हटले आहे कि , “आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार…., सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार. बाळासाहेबांची शिवसेना. निशाणी : ढाल-तलवार.”
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक चिन्हांसंदर्भात दोन स्वतंत्र ई-मेल निवडणूक आयोगाला पाठवले होते. दोन्ही ई-मेलमध्ये प्रत्येक तीन नवीन चिन्हांचा पर्याय सूचवल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये ढाल-तलवार, तळपता सूर्य आणि पिंपळाचं झाड, रिक्षा, शंख आणि तुतारी असे पर्याय देण्यात आले होते.