UttarPradeshNewsUpdate : शुद्धलेखनामुळे दलित विद्यार्थ्याला जीवघेणी मारहाण, शिक्षिकेच्या अटकेच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन …

लखनौ : उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात दहावीत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय दलित मुलाचा शाळेतील तथाकथित सवर्ण शिक्षिकेने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्यामुळे लोक संतप्त झाले आहेत. फरार शिक्षकाच्या अटकेच्या मागणीसाठी उत्तर प्रदेशात आंदोलनाला हिंसक वळण लागले असल्याचे वृत्त आहे.
या मुलाने ७ सप्टेंबर रोजी शाळेतील सामाजिक शास्त्राच्या परीक्षेत शुद्धलेखनाची चूक केल्यामुळे त्याच्या शाळेतील शिक्षिका अश्विनी सिंग यांनी त्याला जबर मारहाण केली होती. निकित दोहरा असे या मुलाचे नाव असून शनिवारी रात्री एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर सोमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान फरार आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करण्याची मागणी करत मयत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय आणि भीम आर्मीच्या सदस्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. जिल्ह्यातील अछलदा भागात निकित ज्या शाळेमध्ये शिकला त्या शाळेबाहेर त्यांनी धरणे आंदोलन केले. दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलना दरम्यान काही संतप्त स्थानिकांनी पोलिसांची जीप पेटवून दिली.
आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केल्याचा आरोप आहे. आंदोलक हिंसक झाल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस आणि जिल्हा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर, मुलाचे कुटुंबीय आणि भीम आर्मी सदस्यांनी निकितचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावी नेण्याचे मान्य केले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शोध सुरू असून शिक्षिका अश्विनी सिंगला लवकरच अटक करण्यात येईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे निषेध आंदोलन भीम आर्मीने केले होते , परंतु हिंसाचार करणारे स्थानिक होते. आरोपींविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन कुटुंबीय आणि संघटनेच्या सदस्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, मुलाच्या वडिलांनी असा दावा केला आहे की, ७ सप्टेंबर रोजी शाळेत सामाजिक शास्त्राच्या परीक्षेदरम्यान एका शब्दाचे स्पेलिंग चुकल्याने शिक्षकाने आपल्या मुलावर लाठ्या-काठ्याने हल्ला केला आणि बेशुद्ध होईपर्यंत त्याला लाथा मारल्या. तक्रारीत त्यांनी पुढे म्हटले आहे कि , शिक्षकाने मुलाच्या उपचारासाठी प्रथम १०,००० आणि नंतर ३०,००० रुपये दिले, परंतु नंतर त्यांचे कॉल बंद झाले. मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, जेव्हा तो शिक्षकाशी बोलला तेव्हा त्याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.