CongressNewsUpdate : काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून गोंधळात गोंधळ , सोनिया गांधी यांनी स्पष्ट केली भूमिका…

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून पक्षांतर्गत गोंधळ वाढला आहे. बुधवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यासंदर्भात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही विशिष्ट नेत्याची बाजू घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेण्यापूर्वी रात्री उशिरा पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली होती. आणि काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले. सूत्रांनी सांगितले की, या बैठकीत गेहलोत यांनी आमदारांना सांगितले की, ते आधी राहुल गांधींना निवडणूक लढवण्यास राजी करतील आणि ते न पटल्यास ते स्वतः उमेदवारी दाखल करतील.
दरम्यान बैठकीला उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, अशोक गेहलोत यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे आमदारांना सांगितले. त्यानंतर संध्याकाळी ते विमानाने केरळला जातील, जिथे राहुल गांधी पदयात्रा करत आहेत. सूत्रांनी सांगितले की, गेहलोत यांनी सांगितले की, राहुल गांधी यांना आपण निवडणूक लढवायला सांगण्याचा प्रयत्न करू, मात्र जर ते अध्यक्षपदासाठी तयार झाले नाहीत तर ते स्वतः दिल्लीत येऊन उमेदवारी दाखल करतील. अर्थात याबाबत पक्षाच्या हायकमांडचा निर्णय आपणास मान्य असेल. आपण पक्षाचा निष्ठावान सैनिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे अनेक नेते या पदाच्या शर्यतीत असल्याचे सांगत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी एनडीटीव्हीशी बोलताना या पदासाठी त्यांच्या नावाचाही समावेश करण्याचे संकेत दिले आहेत. तुम्ही मला या शर्यतीतून का दूर ठेवत आहात, असे त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे दिग्विजय सिंह यांच्या आधी अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांनीही स्वतःला या पदासाठी दावेदार घोषित केले आहे. काँग्रेसने या वर्षी उदयपूर येथे झालेल्या बैठकीत ‘एक व्यक्ती एक पद’ हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अशोक गेहलोत यांनी एकाच वेळी तीन जबाबदाऱ्या पार पाडणार असल्याचे सांगून राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे.