IndiaNewsUpdate : इलेक्ट्रॉनिक बाइक शोरूममुळे लागलेल्या आगीत एका महिलेसह ८ जणांचा मृत्यू …

सिकंदराबाद : तेलंगणातील सिकंदराबादमध्ये एका इलेक्ट्रॉनिक बाइक शोरूमला मध्यरात्री भीषण आग लागली. ही आग शोरूमच्या वरच्या हॉटेलमध्ये पसरली आणि तेथे राहणाऱ्या एका महिलेसह आठ जणांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.
जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनी या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करून पीडितांना केंद्र आणि राज्य सरकारांकडून आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
Saddened by the loss of lives due to a fire in Secunderabad, Telangana. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. Rs. 2 lakh from PMNRF would be paid to the next of kin of each deceased. Rs. 50,000 would be paid to the injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 13, 2022
या विषयी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शोरूममधील आग त्याच्या वर बांधलेल्या ‘हॉटेल रुबी प्राइड’मध्ये पसरली, ज्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. हैदराबादचे पोलिस आयुक्त सी व्ही आनंद म्हणाले, “हॉटेलमध्ये चार मजल्यांमध्ये 23 खोल्या आहेत. पायऱ्यांमधून धूर खालून वर चढला आणि शेवटी सर्व मजल्यांवर पोहोचला. दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर झोपलेले काही लोक धुरातून कॉरिडॉरमध्ये पोहोचले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.”
आगीच्या कारणांचा होईल तपास …
शोरूमच्या मालकाने इलेक्ट्रिक स्कूटर इमारतीच्या तळघरात ठेवल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. बॅटरी चार्ज होत असताना शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. “तळमजला सामान्यतः वाहने पार्किंगसाठी वापरला जावा असे स्पष्ट संकेत आहेत पण याचा वापर वेगळ्याच कारणासाठी केला जात होता याचा तपास केला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अपघाताच्या वेळी हॉटेलमध्ये जवळपास २४ लोक थांबल्याचे सांगण्यात येत आहे. या बहुमजली इमारतीत अडकलेल्या सात जणांना अग्निशमन दलाने बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक आगीपासून वाचण्यासाठी हॉटेलच्या खिडक्यांमधून उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आणि पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF)मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना ५० हजाराची मदत जाहीर केली.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, तेलंगणातील सिकंदराबाद येथे लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास-पन्नास हजार रुपये दिले जातील.