देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे, काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही घोटाळेबाज पक्ष : रेंद्र मोदी

देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणताही ‘पंजा’ तुम्हाला हात लावू शकणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टोला लगावला. मोदी म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही घोटाळेबाज पक्ष आहेत. नंदुरबारमधूनच त्यांनी आधार कार्ड योजनेची सुरूवात केली होती. मात्र, आता ही योजना जेव्हा मी राबवू पहातोय तेव्हा काँग्रेसचे लोक आधार कार्ड योजना बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावत आहेत.
आदिवासी बांधवांसाठी पेन्शन योजना सुरू करणार अशीही घोषणा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मी सत्तेवर आहे तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि इतर पक्ष तुमची थट्टा करीत आहेत. मध्यप्रदेशात आदिवासी विकास योजनांसाठी पाठवलेला निधीही या पक्षांनी खाल्ला. कुपोषणाची समस्या आपल्याला समूळ नष्ट करायची आहे. मात्र, काँग्रेसवाल्यांची नियत साफ नाही म्हणूनच त्यांचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशातही ते या पैशांमध्येही भ्रष्टाचार करीत आहेत, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
काँग्रेसने आजवर शेतकऱ्यांना आणि आदिवासी बांधवांना लुटून खाल्लं आणि आता कर्जमाफी देण्याची गोष्ट करीत आहेत. काँग्रेस नेत्यांनी कायमच शेतकरी आणि आदिवासी बांधवांचा अपमान केला आहे. मात्र, आम्ही शेतकऱ्याला प्रतिष्ठा कशी प्राप्त होईल, आदिवासी बांधवांना सन्मानाने कसं जगता येईल यासाठी प्रयत्न करतो आहोत, असंही मोदी यावेळी म्हणाले.
महायुतीच्या उमेदवार हीना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदुरबारमध्ये सभा घेतली. नवभारत योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना पक्की घरं देणं, त्यांच्या घरी गॅस पोहचणं, त्यांचा सन्मान करणं ही आमची त्रिसूत्री आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.