MaharashtraPoliticalUpdate : ग्रामपंचायत निवडणूक लागल्या , पहिल्यांदाच सरपंचाची निवड जनतेतून …

मुंबई : महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण १८ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींसाठी मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील १ हजार १६६ ग्रामपंतायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या १ हजार १६६ ग्रामपंतायतींसाठी १३ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच १४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ओबोसींच्या राजकीय आरक्षणाचा मोठा प्रश्न प्रलंबित असताना न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार या निवडणूक पार पडणार आहेत. ग्राम पंचायतीच्या या निवडणूक प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्वाच्या मानल्या जातात कारण यातूनच प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता गावागावात सक्रिय होतो त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूक हा राजकीय पक्षांचा पाय मानला जातो. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेला शिंदे गट यांचे राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणूक असल्याने महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात यामुळे मोठा प्रचाराचा धुराळा उडणार यात शंका नाही.
दरम्यान राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.