MumbaiNewsUpdate : अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला बोल , शिवसेना नेत्यांचीही प्रत्युत्तरे ….

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागत त्यांना आगामी निवडणुकीत जमीन दाखविण्याचा इशारा देत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे लक्ष्य १५० जागा जिंकण्याचे असेल अशी घोषणा भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केली आहे. आपल्या मुंबई दौऱ्यात गणरायांचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अमित शाह यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव घेत थेट निशाणा साधला. त्यांनी आपल्याला धोका दिला आणि २०१४ च्या निवडणुकीत केवळ दोन जागांसाठी युती मोडली असे सांगून मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मते मागून जिंकून आल्यानंतर त्यांनी आमच्याशी विश्वासघात केल्याचा आणि पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शाह यांनी केला. दरम्यान उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असा इशारा देत अमित शाह यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
Union Home Minister Amit Shah chairs a meeting of BJP MPs, MLAs, MLCs and corporators with respect to the upcoming BMC elections, at the residence of Deputy CM Devendra Fadanvis in Mumbai. pic.twitter.com/ZhVabKCGEL
— ANI (@ANI) September 5, 2022
मुंबईच्या राजकारणावर केवळ भाजपचे वर्चस्व असावे…
अमित शहा पुढे म्हणाले कि , भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करु नका. जे दगा देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर, नेते देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. त्यानंतर तुम्ही जनतेचा विश्वासघात केला . मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचे असावे, असे विधानही अमित शाह यांनी केले.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवताना शहा म्हणाले कि , ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटले भाजपा युती तोडणार नाही. आपल्याशिवाय भाजपाचे काय होणार, आपल्याच जास्त जागा जिंकून येतील, असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला, असे अमित शाह यांनी सांगितले. स्वत:च्या चुकीमुळेच शिवसेना फुटली, स्वत:च्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाला आहे यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. राजकारणात काहीही सहन करा, पण धोका नाही असा थेट संदेशच अमित शाह यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
देवेंद्र फडणवीस यांचाही कानमंत्र , अभी नही तो कभी नही…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले कि , खरी शिवसेना आपल्यासोबत आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे, असं समजून लढा आणि ‘अभी नही तो कभी नही’, असे ठरवा. तसेच आता केवळ एकच लक्ष्य म्हणजे मुंबई महानगरपालिका. यामध्ये प्रत्येक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना महत्वाची भूमिका बजावावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, नेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते.
शिवसेना नेत्यांची अमित शहा यांच्यावर टीका…
दरम्यान अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागताच शिवसेनेच्या नेत्यांनीही अमित शहा यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले . शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या कि , “कोण कोणाला धोका देतंय, कोणाला खोके देतंय, कोणाचे बोके कोण पळवतंय हे सर्वांना दिसतंय” तसेच तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवताय ? आम्ही जमिनीवरच आहोत. तुम्हीच आसमानात आहात तुम्हाला आम्ही जमिनीवर आणू . धोके कोण कोणाला देतं हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना माहीत आहे असं म्हटलं आहे.
चंद्रकांत खैरे यांचेही अमित शहा यांना उत्तर…
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी “उद्धव ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही. शिवसेनाला कोणीच संपवू शकलं नाही, तुम्ही नष्ट व्हाल पण शिवसेना संपणार नाही. ते काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच जमीन दाखवू. अमित शाह यांनीच शब्द फिरवला. शाह यांच्यासारख्या व्यक्तीने खोटं बोलणं चुकीचं असल्याचे म्हटले आहे.
अंबादास दानवेही आक्रमक
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अमित शाह यांनी मुंबईत गणपतीचे दर्शन घेतले, मात्र मुंबईवर बेगडी प्रेम दाखवण्याचे काम त्यांनी केलं आहे. मुंबईतील अनेक कार्यालये अहमदाबादला हलवून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे,’ अशी जळजळीत टीका अंबादास दानवे यांनी नाशिक येथे केली.