ShivsenaNewsUpdate : शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग , दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार : उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेचा अर्ज अद्याप प्रलंबित असला तरी नियोजित ठिकाणी म्हणजे शिवतीर्थावरच हा मेळावा होईल अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी पत्रकार परिषदते बोलताना, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. “महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहेत. आम्ही हिंदुत्त्व सोडलं अशी आवई भाजपने उठवली होती, त्याला छेद देणारी ही सगळी घटना आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज संघ परिवारातील लोक हिंदुत्त्वाच्या शिवसेनेच्या परिवारात प्रवेश करत आहेत. हिंगोलीतले मातब्बर लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मला एका गोष्टीचा अभिमान आणि आश्चर्य वाटते. साधारणत: सत्ताधारी पक्षाकडे प्रवेशासाठी रांग लागते. पण पहिल्यांदाच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहेत. कारण गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहेत. आम्ही हिंदुत्त्व सोडलं अशी आवई भाजपने उठवली होती, त्याला छेद देणारी ही सगळी घटना आहे.”
मूळ हिंदुत्त्व हे मातोश्रीने दाखवून दिलं : उद्धव कदम
तर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव कदम म्हणाले की, “शिवसेनेचं हिंदुत्त्व हे खरं हिंदुत्त्व आहे, भ्रमित करणारं नाही. कारण मूळ हिंदुत्त्व हे मातोश्रीने दाखवून दिलं आहे. म्हणून या मातोश्रीचं महात्म्य आणि महत्त्व टिकवण्यासाठी मी इथे आलो आहे. माझ्या माध्यमातून मी सर्व बांधवांना सांगत आहेत, तिथे अस्वस्थ वाटत असेल तर मातोश्रीचं दार उघडं आहे.” तसंच मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल, असंही ते म्हणाले.
दसरा मेळावा शिवतीर्थावरच…
या पत्रकार परिषदेच्या वेळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून विवाद सुरु आहे याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक नेहमीप्रमाणे शिवतीर्थावर येतील आणि मेळावा तिथेच होईल. परंतु शिवसेनेला अद्याप शिवतीर्थावर परवानगी मिळालेली नाही. मुंबई पालिकेनेच शिवसेनेला परवानगी देण्याचा निर्णय राखून ठेवला असल्याचे वृत्त आहे.
महापालिकेचे स्पष्टीकरण…
गणेशोत्सव आटोपल्यानंतरच दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय घेऊ असे महापालिका सहाय्यक आयुक्तांचे स्पष्टीकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, सध्या सर्व स्टाफ गणेशोत्सवाकरता आवश्यक प्रशासनिक बाबी आणि तयारीत गुंतल्यामुळे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिंदे गटाचाही दसरा मेळावा …
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही दसरा मेळाव्याचे संकेत दिले आहेत. सकारात्मक संकेत दिले आहे. हिंदुत्ववादी विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसैनिक जमत आले आहेत . आता आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहोत. जे हिंदुत्वावादी विचारांवर अधिकार सांगत आहे, त्यांनी विचार सोडले आहे. त्यामुळे त्यांना मेळावा घेण्याचा कोणता अधिकार आहे? हा मेळावा घेण्याचा आमचा अधिकार आहे. त्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा आहे या संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे म्हस्के यांनी म्हटले आहे.