ShivsenaCourtNewsUpdate : मोठी बातमी : ठाकरे विरुद्ध शिंदे : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची तारीख पुन्हा लांबणीवर …

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी पूर्ण पीठ निर्माण करण्याचे विचाराधीन असल्याचे म्हटले होते. त्यामुळे राज्यातील राजकीय पेच प्रसंगावर देशाच्या दृष्टीने ऐतिहासिक निकाल लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे , मात्र आता हि सुनावणी १२ ऑगस्ट रोजी न होता पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून आता हि सुनावणी तब्बल १० दहा दिवसा नंतर म्हणजे २२ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे सरन्यायाधीश रमणा २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे या याचिकांचा निकाल ४ दिवसात लागणार कि नव्या पिठासमोर याची सुनावणी पुढे चालू राहणार ? असा प्रश्न चर्चिला जात आहे.
शिवसेना आणि शिवसेना बंडखोर यांच्याशी संबंधित या याचिकांच्या सुनावणीच्यावेळी झालेल्या युक्तिवादाच्या दरम्यान न्या. एन व्ही रमणा यांनी बंडखोर गटाला उद्देशून अनेक प्रश्न उपस्थित केले होते , तसेच निवडणूक आयोगालाही त्यांच्याकडे दाखल असलेल्या प्रकरणात तूर्त कोणताही निर्णय न देण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारही रखडला होता परंतु या याचिकांवरील सुनावणी पुढे पुढे ढकलण्यात येत असल्याने राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून टाकला आहे.
सुनावणी पुन्हा १० दिवस लांबणीवर…
गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेना पक्षात सुरु असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात आहे. उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरण्याबाबत, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत आणि सरकारच्या स्थापनेबाबतच्या याचिका दाखल केलेल्या आहेत. पण यावर सलग सुनावणी झालेली. ८ ऑगस्टला यावर सुनावणी होणार होती. पण ऐनवेळी ही सुनावणी लांबणीवर पडून १२ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा एकदा ही सुनावणी तब्बल दहा दिवसांनी लांबवणीवर पडली असून पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे.
सरन्यायाधीश रमणा यांना मिळणार केवळ चार दिवस …
दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर नेते , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या ही सर्वात मोठी चर्चेची बातमी आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू होती. २६ ऑगस्ट रोजी ते निवृत्त होणार असल्याने आणि त्यांच्याकडे सुनावणीसाठी केवळ चारच दिवस बाकी असल्याने आता ही सुनावणी त्यांच्या समोरच होणार कि, पुन्हा वेगळ्या घटनापीठाकडे वर्ग होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे सरन्यायाधीश रमणा यांनी आतापर्यंत घटना आणि कायद्यांवर बोट ठेवून या याचिकांच्या सुनावणीदरम्यान आपली कडक निरीक्षणे नोंदवल्याने यातून ऐतिहासिक निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.