MaharashtraPoliticalUpdate : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादहून थेट दिल्लीला रवाना…

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादमध्ये असताना अचानक दिल्लीचा फोन आल्यामुळे आपला दौरा सोडून दिल्लीला प्रस्थान केले आहे. एका महिन्यातील त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात सर्वोच्च न्यायालयातील खटले आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान रात्री ते औरंगाबादहून दिल्लीला रवाना होतील आणि उद्या सकाळी परत औरंगाबादला येऊन नियोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीचे सरकार जाऊन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हातात घेऊन महिना उलटला असला तरी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे मंत्री मंडळ विस्ताराचा कोणताही निर्णय सरकारला घेणे कठीण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवासांपासून भाजपाचे दिल्लीमधील वरिष्ठ नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरु आहे. शिंदे महिन्याभरात आतापर्यंत एकूण पाच वेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. असे असताना आजदेखील ते औरंगाबादचा दौरा आटोपून पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झाले आहेत.