ShivsenaNewsUpdate : मोठी बातमी : शिवसेनेच्या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातील लढतीत निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. उद्धव ठाकरे गटातील मुख्य खटल्यासह या प्रकरणावर 1 ऑगस्टला एकत्रित सुनावणी होणार आहे.
ठाकरे गटाचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती, तर शिंदे गटाकडून उपस्थित असलेले एनके कौल यांनी त्यास विरोध केला. कौल म्हणाले की, ही दोन स्वतंत्र प्रकरणे आहेत. ठाकरे गटाचे कपिल सिब्बल म्हणाले, “शिंदे गट हे प्रकरण निष्फळ करण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत ते निवडणूक आयोगापुढे जाऊ शकत नाहीत.”
यावर सरन्यायाधीश एनव्ही रमणा म्हणाले की, आम्ही या याचिकेला इतर प्रकरणाशी जोडतो आणि सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी केली जाईल.
वास्तविक, उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना ‘खरी’ म्हणून मान्यता देण्याच्या एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेवर निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोग खरी शिवसेना कोण हे ठरवू शकत नाही, असे उद्धव गटाचे म्हणणे आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव गटाला ८ ऑगस्टपर्यंत शिवसेनेच्या अधिकाराचा दावा दाखल करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या या आदेशाला उद्धव गटाने आव्हान दिले आहे. निवडणूक आयोगाचा हा आदेश असंवैधानिक आणि घाईघाईने घेतलेला निर्णय असल्याचे उद्धव गट म्हणत आहे. ठाकरे गटाचे शिवसेना सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे.