ShivsenaNewsUpdate : उद्धव ठाकरे यांची बंडखोर आणि भाजपवर तुफान फटकेबाजी …

मुबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतल्या ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपशी संसार थाटत मुख्यमंत्री पद मिळवत संपूर्ण शिवसेनाच हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु केल्याने उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि बंडखोरांना चांगलेच झोडपून काढले. मर्द असाल तर शिवसेना आणि माझ्या वडिलांचे नाव न वापरता मतं मागवून दाखवा आणि निवडून येऊन दाखवा असे थेट आव्हानच पुन्हा एकदा दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोपाचं चांगलाच भडका उडाला आहे. हा संघर्ष एकीकडे न्यायालयात तर दुसरीकडे रस्त्यावर होणार असे दिसत आहे. भाजपच्या प्रोत्साहनामुळे शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यावर शिवसेना पक्ष संघटनेवरील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा, असे निर्देश निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दिले आहेत.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्देशानंतर आता उद्धव ठाकरेंनी भर सभेत शिसैनिकांना महत्त्वाच्या दोन गोष्टी मागितल्या आहेत. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी झाली पाहिजे. तसेच मला सर्व पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे हवी आहेत. शिवडी शाखेच्या उदघाटनाच्या निमित्ताने ते शिवसैनिकांना संबोधित करत होते.
पुष्पगुच्छ नको , मला दोन गोष्टी हव्या आहेत…
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले कि, “सध्या न्यायालयात खटला सुरु आहे. मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. पण आता त्यांनी आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे निवडणूक आयोगाला सांगितले आहे. या कारस्थानाला नुसत्या जल्लोषाने उत्तर देऊन चालणार नाही. त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील. पहिली म्हणजे आपल्या पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र द्यावे लागेल. मला प्रत्येकाचे शपथपत्र हवे आहे.
मी पक्षप्रमुख आहे. माझ्यासह गटप्रमुख ते सर्व पदाधिकाऱ्यांचे मला शपथपत्रे हवी आहेत. त्यानंतर जास्तीत जास्त सदस्यनोंदणी झाली पाहिजे. मला सदस्यनोंदणीच्या अर्जाचे गठ्ठेच्या गठ्ठे हवे आहेत. काही दिवसानंतर माझा वाढदिवस आहे. मला पुष्पगुच्छ नको आहेत. मला सदस्यांच्या अर्जाचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवे आहेत,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
बंडखोर आमदारांवर टीका करताना ठाकरे म्हणाले कि , “बिकाऊ असणारे सगळे गेले आहेत. आता त्यांनी वेगवेगळ्या एजन्सीज कामाला लावल्या आहेत. त्यांच्याकडे पैसा अमाप आहे. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. ही साधी माणसं माझे वैभव आहे. तुम्ही कितीही पैसा ओतलात तरी हे वैभव त्याला पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही.”
शिंदे गटाला खुले आव्हान
शिंदे गटाला खुले आव्हान देताना ते म्हणाले कि , “त्यांना शिवसेनेला संपवायचे आहे. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाते घट्ट राहणार. तुमच्या कित्येक पिढ्या उतरल्या तरी त्यांना पाताळात गाडून आम्ही येऊ. त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नाते तोडायचे आहे. ही बंडखोरी नाही. ही हरामखोरी आहे. हा नमकहरामीपणा आहे. एवढीच मर्दुमकी असेल तर माझ्या वडिलांचा म्हणजेच शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावाने मतं मागा. तुम्हाला माझे वडील चोरायचे आहेत. पक्षही चोरायला निघाला आहात. तुम्ही कसले मर्द आहात. अशा लोकांच्या हातात महाराष्ट्र, मुंबई आणि तुमचे आयुष्ये देणार आहात का?”
भाजपवर हल्ला बोल आणि केमिकल लोचा…!!
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या मतावर त्यांचे नाव न घेता आपल्या शैलीत मिश्किल प्रतिक्रिया दिली. राज यांच्याबाबत त्यांनी पुन्हा एकदा “केमिकल लोच्या… ” या शब्दाचा पुनरुच्चार केला. दरम्यान भाजपवर तुफान टोलेबाजी करताना युतीचा इतिहास सांगत भाजपने शिवसेनेशी कशी दगेबाजी झाली, हे सांगण्याचा प्रयत्न केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.
ते म्हणाले कि , कायद्यानुसार बंडखोरांना कुठल्यातरी एका पक्षात जावंच लागणार.. ते कुठल्या पक्षात जाणार? काल त्यांना एका पक्षाने ऑफर दिली आहे…, असं उद्धव ठाकरे हसत हसत म्हणाले. तेवढ्यात खालून शिवसैनिकांमधून केमिकल लोच्या… केमिकल लोच्या… असे आवाज आले. उद्धव ठाकरेंनी देखील शिवसैनिकांच्या सुरात सूर मिसळून “किती जणांचा केमिकल लोच्या झाला असेल ते सांगता येत नाही..असे म्हणत राज ठाकरे यांच्यावर टीका केली.