BJPNewsUpdate : मिशन २०२४ : भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली : आगामी २०२४ च्या निवडणुका लक्षात घेऊन राजधानी दिल्लीमध्ये भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास उपस्थिती आहे.
भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेच्या या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी , उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
या बैठकीत केंद्र सरकारची धोरणे प्रभावी कशी करता येतील यावर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत की नाही, यावरही विचारमंथन होणार आहे. २०२४ बरोबरच आगामी विधानसभा निवडणुकांवर विचारमंथन करणे हे या बैठकीचे सामान्य उद्दिष्ट आहे.
केंद्र सरकारच्या योजनांचा प्रभाव, उत्तम प्रशासन, तिरंगा योजना, राज्यांमधील परस्पर समन्वय कसा वाढवता येईल, याचा समावेश बैठकीच्या अजेंड्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही राज्ये चांगली कामगिरी करत आहेत, तर काही राज्यांची कामगिरी सुधारण्याची गरज आहे, याचाही आढावा बैठकीत घेतला जाईल.
या बैठकीला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केशव मौर्य, ब्रजेश पाठक, देवेंद्र फडणवीस, बिरेन सिंह बसवराज बोम्बई, जयराम ठाकूर हे दिग्गज नेतेही उपस्थित आहेत. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करतील.
याआधी डिसेंबर २०२१ मध्ये उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे बैठक पार पडली होती. तेव्हा १२ भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले होते. आता पुन्हा एकदा भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शनही करणार आहेत.