ShivsenaNewsUpdate : मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले उत्तर

मुंबई : सध्या राज्यामध्ये सत्तेत असणारे सरकार हे पूर्णपणे कायदेशीर असल्याचे सांगतानाच हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर सध्या राज्यामध्ये सत्तेत आलेले शिंदे गट आणि भाजपाचे सरकार हे बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. त्याला एकनाथ शिंदे यांनी हे उत्तर दिले.
एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ४० पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी करत भाजपाशी हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार घटनाबाह्य असून ते लवकरच कोसळणार आहे,” असा दावा करताना , “बंडखोर आमदारांकडून आम्ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उठाव केला, बंड केले अशी वाक्ये सतत वापरण्यात येत आहेत मात्र, मुळात हे बंड नसून गद्दारी आहे आणि ही केवळ राजकीय गद्दारी नाही तर माणूसकीशी केलेली गद्दारी आहे,” अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली होती.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदेंनी आमच्यामागे बहुमत असल्याचा दावा केला. “सरकार हे लोकांनी निवडून दिलेलं असतं. बहुमत आमच्याकडे आहे. लोकसभा आणि विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेमध्ये आमच्या ५० लोकांना अध्यक्षांनी मान्यता दिलीय,” असं शिंदे म्हणाले.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीचाही संदर्भही शिंदे यांनी यावेळेस बोलताना दिला. ते पुढे म्हणाले कि , “हा वाद न्यायालयात असून न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे ते बरखास्त करा अशी विरोधकांची मागणी होती. अध्यक्षांची निवड, सरकारची स्थापना बेकायदेशीर असून त्याला स्थगिती द्यावी अशी त्यांची मागणी होती. विश्वासदर्शक ठरावाला स्थगिती द्या असेही ते म्हणाले होते. मात्र न्यायालयाने कशालाच स्थगिती दिलेली नाही. म्हणूनच आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.”