प्रज्ञा साध्वीला भाजपने उमेदवारी देणे शहिदांचा अपमान : प्रकाश आंबेडकर

‘आपल्या शापाने करकरे वर गेले त्यांचा सर्वनाश झाला असे उद्गार काढणा-या साध्वी प्रज्ञाला उमेदवारी देणे हा शहिदांचा अपमान असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. कोल्हापूरच्या सभेत ते बोलत होते.
आपल्या भाषणात त्यांनी मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले की, भारतीय चलनावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांचा अधिकार असतो. पंतप्रधानांना चलन बदलण्याचा कोणताही अधिकारी नसताना त्यांनी केवळ लूट करण्याच्या उद्देशाने नोटाबंदीचा निर्णय घेतला. काळा पैसा बाहेर काढण्याची गर्जना करणाऱ्यांनी कमिशनवर नोटा बदलून दिल्या. नोटा बदलून देणारे केंद्रातील सरकार चोर, लुटारूंचे असून, पंतप्रधानपदावर बसलेले नरेंद्र मोदी लुटारू आहेत,’ असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
गांधी मैदान येथे शनिवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी व हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अॅड. आंबेडकर म्हणाले, ‘आरबीआयकडून निघणाऱ्या चलनावर बँकेच्या गव्हर्नरांची स्वाक्षरी असते, पण पंतप्रधानांनी काळ्या पैसेवाल्यांना अभय देण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ३० ते ७० टक्क्यांपर्यंत कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून देणारे हे सरकार चोर, लुटारू आणि दरोडेखोरांचे सरकार आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल प्राणपणाने लढले. मुंबई हल्ल्यातील अतिरेकी कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा चेहरा आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड केला. त्या पोलिस दलाचा सर्वांनाच अभिमान आहे. ज्यावेळी कसाब गुजरातमधील पोरबंदरमधून मुंबईत दाखल झाला, त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. त्याची चौकशी काँग्रेसने का केली नाही? हल्ल्यात अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर यांच्यासह काहीजणांना वीरमरण आले. त्याच शहिदांचा अपमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग यांना भाजपने उमेदवारी दिली. साध्वी आपल्या शापाने करकरेंची हत्या झाल्याचे म्हणतात. मग ही शापाची गोळी आली कोठून? जे पंतप्रधान शहिदांचे गुणगान गाऊन मते मागतात, त्याच शहिदांचा अपमान करणाऱ्यांना ते उमेदवारी देतातच कसे? कोल्हापूर जिल्ह्यात धनदांडग्यांचे राजकारण चालते. परिणामी कोल्हापूर भांडवलदारांचा कैदखाना झाला असून, या कैदखान्यातून सुटका करण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा.’