MumbaiNewsUpdate : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रियासह ३४ जणांवर आरोपपत्र , काय आहेत आरोप ?

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अभिनेता सुशांत सिंग ड्रग्स प्रकरणात आरोपी बनवले आहे. या प्रकरणी एजन्सीने आरोपपत्र दाखल केले असून त्यात रिया चक्रवर्तीचेही नाव आहे. एनसीबीच्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती गांजा घेऊन सुशांत सिंह राजपूतला द्यायची असा आरोप करण्यात आला आहे. सुशांतने तिला गांजा खरेदी करण्यासाठी अनेक वेळा पैसे दिले. रियावर कमी प्रमाणात गांजा खरेदी करून खरेदीसाठी अधिक किंमत घ्यायची असा तिच्यावर आरोप आहे.
एनसीबीने आरोपपत्रात म्हटले आहे की, “…आरोपी क्रमांक १० रिया चक्रवर्ती हिने आरोपी क्रमांक ६ सॅम्युअल मिरांडा, आरोपी क्रमांक ७ सौविक चक्रवर्ती आणि आरोपी क्रमांक ८ दीपेश सावंत आणि इतरांकडून अनेकवेळा गांजा घेऊन तिने सुशांतला दिला आहे . मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० दरम्यान हे व्यवहार करण्यात आले.
दरम्यान सुशांत सिंग राजपूतशी संबंधित या ड्रग्स प्रकरणात एजन्सीने रिया चक्रवर्तीसह इतर ३४ जणांना आरोपी बनवले आहे. या प्रकरणात रिया दोषी सिद्ध झाल्यास तिला किमान १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणी रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर ती तुरुंगात होती, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला, तेव्हापासून ती जामिनावर बाहेर आहे.
१४ जून २०२० रोजी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील घरातून सापडला तेव्हा ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया सुरू झाली. सीबीआय त्याच्या मृत्यूचा तपास करत आहे, मात्र मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. दरम्यान ड्रग्जचा अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्री याच्या विळख्यात आली आणि अनेक छोट्या-मोठ्या कलाकारांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.