ShivsenaNewsUpdate : बंडखोर आमदारांना आदित्य ठाकरे यांनी दिले हे आव्हान ….

मुंबई : बंडखोर आमदारांमध्ये थोडी जरी लाज, हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा असे आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिले आहे . शिवसेनेच्या निष्ठा यात्रे अंतर्गत दहिसर येथे शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य बोलत होते. “ज्यांना परत यायचे आहे, त्यांना मी एवढच सांगतोय मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, अगोदरही होते व पुढे राहतील. आमचे मन मोठे आहे. जसा त्यावेळी आम्ही विश्वास ठेवला तसाच विश्वास आम्ही प्रत्येक शिवसैनिकावर टाकत असतो, असेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि , मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, जे स्वत:च्या मनाने गेले असतील, काही दडपण असतील त्यांच्यावर इतर काही वेगळ्या गोष्टी असतील, त्यांना मला एकच निरोप द्यायचा आहे. जिथे तुम्ही गेलात तिथे आनंदी रहा, सुखी रहा. तुमच्या बद्दल आमच्या मनात राग, द्वेष नाही. दु:ख निश्चित आहे की आम्ही तुम्हाला शिवसैनिक समजायचो, तुमच्यावर विश्वास ठेवला होता. पण मागील दोन आठवडे मी जे बघतोय ते सगळं दु:ख दायकच आहे.
“मी आज त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करायला आलो नाही. जे निघून गेले ते निघून गेले, आपण त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांच्यात पण दोन गट आहेत, जे लवकरच कळतील. कारण, एक गट असा आहे ज्याला खरोखर जायचे होते . त्यांना यातच आनंद मिळतो की हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली उतरवले . काही लोकांच्या राक्षसी महत्वकांक्षा असतात. काही लोकांना तुम्ही कितीही दिले तरी त्यांचे पचन होतंच नाही, अपचन होतंच असते . पण दुसरा गट असा आहे ज्याला पळवून नेले . हे आपल्याला लवकरच समजेल.” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.