IndiaNewsUpdate : नुपूर शर्माचा शिरच्छेद करून आणण्याचा व्हिडीओ बनविणाऱ्या “खादीमा”ला अटक

जयपूर/अजमेर : प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माचा शिरच्छेद करून आणण्याचा व्हिडीओ बनविणाऱ्या राजस्थानमधील अजमेर दर्ग्याच्या खादिमाला अटक करण्यात आली आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपले घर देण्याची घोषणा खादिमने केली होती. चिश्ती हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खून आणि खुनाच्या प्रयत्नासह १३ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आरोपीने मद्यधुंद अवस्थेत हा वादग्रस्त व्हिडिओ बनवल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी काल रात्री आरोपीच्या अटकेची पुष्टी करून हि माहिती दिली आहे.
Rajasthan | Ajmer Police arrested Salman Chishti, Khadim of Ajmer Dargah last night for allegedly giving a provocative statement against suspended BJP leader Nupur Sharma: Additional Superintendent of Police, Vikas Sangwan pic.twitter.com/6U3WCjVar7
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 6, 2022
सोमवारी रात्री व्हायरल झालेल्या या व्हिडिओ क्लिपवरून एफआयआर दाखल झाल्यानंतर राजस्थान पोलिस सलमान चिश्तीचा शोध घेत होते. या व्हायरल व्हिडिओमध्ये, जो कोणी नुपूर शर्माचे डोके आपल्याकडे आणेल, त्याला आपले घर देईल. प्रेषितांचा अपमान केल्याबद्दल मी नुपूर शर्माला गोळ्या घातल्या असत्या, असे तो म्हणताना दिसत आहे.
सुफी दर्ग्याचा संदर्भ देत तो व्हिडिओमध्ये म्हणाला, ‘तुम्हाला सर्व मुस्लिम देशांना उत्तर द्यावे लागेल. मी हे राजस्थानमधील अजमेरहून सांगत आहे आणि हा संदेश हुजूर ख्वाजा बाबांच्या दरबारातील आहे. दर्गा पोलीस स्टेशनचे एसएचओ दलवीर सिंग फौजदार यांनी सांगितले की, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Ajmer, Rajasthan | It was brought to my notice that Salman Chishti, Khadim of Ajmer Dargah shared an objectionable video & FIR was filed. He was nabbed from his house & is being questioned. It seems he was in an inebriated state when video was made. He is a history-sheeter: ASP pic.twitter.com/uH3ukU2PDR
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 6, 2022
दर्गा व्यवस्थापनाचा संबंध नाही …
दरम्यान अजमेर दर्ग्याचे दिवाण जैनुल अबेदिन अली खान यांनी या व्हिडिओचा निषेध केला आणि म्हटले की प्रसिद्ध दर्ग्याकडे जातीय सलोख्याचे स्थान म्हणून पाहिले जाते. व्हिडीओमध्ये ‘खादिम’ने व्यक्त केलेले मत दर्गाचा संदेश म्हणून घेता येणार नाही. ही टिप्पणी वैयक्तिक विधान असून अत्यंत निषेधार्ह आहे, असे त्यात म्हटले आहे.
उदयपूरमध्ये कन्हैयालाल टेलरच्या हत्येनंतर राजस्थानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर आपल्याला धमक्या येत असल्याची तक्रार कन्हैयालालने पोलिसांत दाखल केली होती.
यानंतर दोन लोकांनी कन्हैयालालची हत्या केली आणि त्याला कॅमेऱ्यात कैदही केले. हत्येतील आरोपी रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद यांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी हत्येच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींना धमकीही दिली होती. राज्य पोलीस आता जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.