MumbaiNewsUpdate : उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर सीबीआय आणि ईडीच्या तपासातून मुक्त

मुंबई : सीबीआय आणि ईडीच्या रडारवर असलेले उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित प्रकरणात कारवाईसाठी सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयकडून कोर्टात सादर करण्यात आला असून न्यायालयाने हा रिपोर्ट स्वीकारला असल्याने पाटणकरांना दिलासा मिळाला आहे.
मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर असणारे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरुन किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. सोमय्यांनी म्हटले होते की, उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. ही कंपनी पाटणकर यांची आहे. यात २९ कोटी काळा पैसा गुंतवला आहे. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असं सोमय्या म्हणाले होते.
याप्रकरणी तपासाअंती आरोपींविरोधात कोणतेही पुरावे सापडत नसल्याने हा तपास बंद करत असल्याचा अहवाल सीबीआयच्यावतीने कोर्टात सादर करण्यात आला. मात्र या रिपोर्टला ईडीच्या माध्यमातून विरोध करण्यात आला. आमचाही तपास याच दिशेने सुरू आहे त्यामुळे हा रिपोर्ट स्वीकारल्यास आमच्या तपासावरही त्याचा थेट परिणाम होईल असा दावा करण्यात आला. मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ए. एस सय्यद यांनी हा दावा फेटाळून लावला. यापूर्वी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये काही त्रुटी होत्या, त्यामुळे आम्ही तो अमान्य केला होता. मात्र आता आमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तपासयंत्रणेनं दिली आहेत, त्यामुळे दोघांनी एकाच प्रकरणाचा तपास करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही असे निरिक्षण कोर्टाने नोंदवले आहे.