JalnaNewsUpdate : जालन्यातही भाजपचा जल आक्रोश मोर्चा , महाविकास आघाडीवर टीकास्त्र …

सुबोधकुमार जाधव / जालना : औरंगाबाद नंतर भाजपने जालनेकरांच्या पाणी प्रश्नावरूनही पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. जालन्याचे हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, संतोष पाटील दानवे यांनी मविआ सरकारवर हल्लाबोल केला.
जालना शहरातील मामा चौकातून हा मोर्चा सुरु झाला .दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास या मोर्चास प्रारंभ झाला. मामा चौक ते सराफा बाजार, काद्राबाद, सुभाष चौक, मंमादेवी चौक मार्गे हा मोर्चा गांधीचमन येथे गेला. गांधीचमन येथे जाहीर सभेत या मोर्चाचे रूपांतर झाले.
दरम्यान जलआक्रोशात मोर्चावेळी पाऊस आल्यामुळे फडणवीसांनी शाब्दिक कोटी केली. “सरकार कुठे चाललंय?, मुख्यमंत्री कार चालवतात, अन् सरकार भगवान चालवतं. ईश्वर भरोसे चाललंय सगळं. आम्ही पाणी मागायला आलो. मुख्यमंत्र्यांनी पाणी दिलं नाही. पण ईश्वराने पाणी दिलं”.यावेळी महाविकास आघाडीवर टीका करताना फडणवीस म्हणाले कि , गेल्या अडीच वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात, 129 कोटी रुपयांचे काय केले? नाकर्तेपणामुळे पाणी देता येत नाही, तेच असे प्रश्न विचारात आहेत. पाणीप्रश्नावर भाजप काय उपाय करणार, सरकारकडे पैसे आहेत.
जालन्याला १२९ कोटी दिले …
रावसाहेब दानवे यांच्यामुळेच १२९ कोटी रुपये जालन्याला मिळाले आहेत. आम्ही औरंगाबादेत आक्रोश मोर्चा काढल्यामुळेच सरकार जागे झाले आणि मुख्यमंत्री औरंगाबादेत आले. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती जालन्यामध्ये आहे. पैठणच्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असताना जालन्यात मात्र १५-१५ दिवस पाणी येत नाही. सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढला आहे, जे सरकार सामान्य माणसांची दखल घेत नाही, ते जागेवर राहत नाह,” अशी टीकाही फडणवीसांनी केली.
आमची मते चोरीला गेली : रावसाहेब दानवे
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले कि , देवेंद्र फडणवीस म्हणजे ‘शतरंज का बादशाह’ आहेत. या सरकारला पाणी प्रश्न सोडवायला जमले नाही. भाजप सरकारच्या काळात मराठवाड्यात अनेक पाण्याच्या योजना आणल्या. पण या ठाकरे सरकारने सगळ्या योजनांना स्थगिती दिली. जालन्याला आम्ही निधी दिला. आता राज्यात त्यांचे सरकार आहे, या निधीचा हिशोब राज्य सरकारने दिला पाहिजे? आमचे उत्तरदायित्व आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना पैसे दिले. आमचे मते चोरीला गेले. आम्ही येणाऱ्या निवडणुकीत यांना शिक्षा देऊ, असा इशारा दानवे यांनी शिवसेनेला दिला.