MaharashtraPoliticalUpdate : राज्यसभेच्या सहाव्या उमेदवाराच्या विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

मुंबई : भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचे उमेदवारी अर्ज आज विधानभवनात जाऊन दाखल केले. यावेळी बोलताना , संख्याबळ नसतानाही तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून भाजपला घोडेबाजार करायचा आहे, या शिवसेनेच्या आरोपाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. तुम्हाला घोडेबाजाराची इतकीच चिंता असेल तर तुमचा उमेदवार मागे घेऊन प्रश्नच मिटवून टाका, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दरम्यान या निवडणुकीत आमचे तीनही उमेदवारी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि , आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे. तुम्हाला घोडेबाजाराची भीती वाटत असेल तर तुम्ही उमेदवार मागे घ्या, म्हणजे घोडेबाजार होणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार सद्सद्विवेकबुद्धी आम्हाला मतदान करतील. त्यामुळे आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान तुम्ही धनंजय महाडिक यांना कसे निवडून आणणार ? या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ज्या अर्थी आम्ही राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार उतरवला आहे त्या अर्थी आम्ही काहीतरी विचार केलाच असेल ना. तिसरा उमेदवार कसा निवडून आणणार, याबाबत आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे. पण त्याबद्दल मीडियात चर्चा करायची नसते.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत आहे. सध्याच्या संख्याबळानुसार दोन जागांवर भाजप आणि प्रत्येकी एका जागेवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. मात्र, सहावी जागा जिंकण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे हि जागा शिवसेना मिळणार कि , भाजप असा प्रश्न निर्माण झाला आहे.