MaharashtraNewsUpdate : ….जेंव्हा मीडियावाले पवारांच्या मागे लागतात , आणि राष्ट्रवादीकडून हा खुलासा येतो …!!

पुणे : आपल्याकडे माध्यमात कशाची चर्चा होईल काहीच सांगता येत नाही . तशीच चर्चा आज पुण्यात सुरु झाली होती. त्याचे असे झाले कि , राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज पुण्यात आहेत . आपल्या या दौऱ्यात त्यांनी भिडे वाड्याची पाहणी केली हि माहिती मिळताच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विश्वस्त मंडळींकडून त्यांना गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी येण्याचा आग्रह करण्यात आला. त्यानुसार शरद पवारांनी भिडे वाडयाची आणि मंदिर परिसराची बाहेरून पाहणी केली. मात्र ते मंदिरामध्ये गेले नाहीत. दगडूशेठ गणपतीचे मुख दर्शन घेतले.आणि ते निघून गेले . आणि हीच बातमी माध्यमांनी इतकी लावून धरली कि शेवटी राष्ट्रवादीला खुलासा करावा लागला.
असे कसे होऊ शकते ? असे म्हणून या दौऱ्या दरम्यान ते आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गेले. पण पवार गणपती बाप्पाचं दर्शन न घेताच बाहेरुन मुख दर्शन घेऊन निघून गेले. त्यामुळे इलेकट्रॉनिक माध्यमांनी चर्चेला ऊत आणला. खरंतर शरद पवार दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होते. मात्र आयत्यावेळी पवारांनी मंदिरात न जाण्याचा निर्णय घेत बाहेरुन दर्शन घेणे पसंत केले .
अखेर या चर्चेला राष्ट्रवादीला उत्तर द्यावेच लागले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार नॉनवेज खाल्ले असल्याने मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी न जाता बाहेरुन दर्शन घेतले.
आणि पवार मंदिरात आलेच नाही …
एबीपी माझाच्या वृत्तानुसार शरद पवार आज दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला येणार म्हणून अख्खा मीडिया सज्ज होता. पवारांची गाडीही आली पण पवार थेट उतरून शेजारीच असलेल्या भिडे वाड्यासमोर गेले. फुले दाम्पत्याने सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची पाहाणी केली आणि मगच त्यांची पावले दगडूशेठ गणपतीकडे वळली. पवार मंदिरात येणार म्हणून मीडियाची धावपळ उडाली. सगळे कॅमेरामन मंदिरात जागा मिळवण्यासाठी पळू लागले. आता पवार आत आले की आपल्या कॅमेऱ्यात सर्वात आधी दिसणार अशी जागा प्रत्येकाने हेरली. पण पाच मिनिटांनंतरही पवार आलेच नाहीत.
दरम्यान शरद पवार मंदिरात येणारच नाहीत अशी माहिती नंतर समोर आली. पवार मंदिराच्या उंबऱ्याबाहेरच उभे राहिले. मंदिर विश्वस्तांनी दारातच हार, तुरे आणि प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. पवारांनीही बाप्पासमोर हात जोडले आणि तिथूनच ते रवाना झाले.