Loksabha 2019 : पुलवामा आणि बालाकोट हल्ल्यावर मत मागितले, PM मोदी अडचणीत ? : निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

अखेर बालाकोटमधील हवाई हल्ल्यासंदर्भात मत मागितल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी आपले मत बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्यांना आणि पुलावाममधील शाहिदांना अर्पण करावे , असे वक्तव्य मोदींनी बिनदिक्कत केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या अखेर मोदींच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी अहवाल मागितला आहे.
काल लातूरमधील औसा येथे महायुतीची प्रचारसभा झाली होती . या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण करताना या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना मला एक सांगायचं आहे. तुम्ही तुमचे पहिले मत पाकव्याप्त काश्मीरमधील बालकोट येथे दहशतवादी तळांवर हल्ला करणाऱ्या वीर जवानांना आणि पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अर्पण करा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते.
भारतीय लष्कर आणि जवानांच्या नावाने पक्षाने किंवा उमेदवाराने प्रचारातून किंवा निवडणुकीसंदर्भातील कुठल्याही कार्यक्रमातून मत मागू नये, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने १९ मार्चला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी लातूरच्या औसामध्ये बालाकोट हवाई हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.